
अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने पावसाचे ढग तयार करण्याचे एक खास तंत्रज्ञान केले असून, त्यामुळे मशीनद्वारे ढग तयार करून पाऊस पाडणे शक्य होणार आहे, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. एका मिनिटाचा हा व्हिडियो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात शेयर केला जात आहेत. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली आहे.
मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
गावरान वादळ नावाच्या पेजने हा व्हिडियो शेयर केला आहे. यामध्ये एका मोठ्या यंत्रातून पांढऱ्याशुभ्र धुराचे विशालकाय लोट बाहेर पडताना दिसतात. मग एक अँकर इंग्रजीतून माहिती देतो की, “हवेत दिसणारे हे पांढरे ढग या इंजिनमधून तयार झालेले असून, ते हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मिश्रण आहे. म्हणजेच पाण्याची वाफ आहे. या ढगांमधून एका तासात मिसिसिपीमध्ये पाऊस पडेल.” क्लिपमध्ये मग पाऊस पडताना दिसतो. भिजत अँकर सांगतो की, जसे की मी सांगितले होते, आता पाऊस सुरू झाला आहे. नासा जणू काही देवच बनली आहे. ते स्वतःचे वातावरण स्वतः तयार करू लागले (NASA is playing God, it’s making its own weather). सोबत कॅप्शन दिले की, समुद्राच्या पाण्याला भट्टीवर तापवून वाफ/पावसाचे ढग बनवणारी मशीन नासा ने बनवली. भारताला या तंत्रज्ञानाची नितांत गरज आहे.
तथ्य पडताळणी
पोस्टमधील व्हिडियो क्लिपमध्ये बीबीसीचा लोगो दिसतो. म्हणजे हा व्हिडियो बीबीसी वाहिनीने तयार केलेला असावा. हा धागा पकडून जेव्हा गुगलवर शोध घेतला, तेव्हा द व्हर्ज वेबसाईटवरील गेल्यावर्षीचा एक लेख आढळला. त्यानुसार, या व्हिडियोमध्ये बीबीसी वाहिनीवरील टॉप गियर कार्यक्रमाचा माजी सूत्रसंचालक जेरेमी क्लार्कसन आहे. तसेच या व्हिडियोमध्ये जी पांढरा धूर बाहेर टाकणारी मशीन दिसतेय ते मूळात नासाचे शक्तीशाली रॉकेट इंजिन आहे. पोस्टमधील क्लिपमध्ये दोन व्हिडियोतील क्लिप एकत्र करण्यात आलेल्या आहेत. व्हिडियोच्या सुरुवातीला मिसिसिपी येथे नासाच्या स्पेस लाँच सिस्टमसाठी वापरण्यात येणाऱ्या RS-25 रॉकेटची चाचणी दिसते. क्लार्कसनच्या मागे RS-68 रॉकेटची चाचणी केली जातेय.

मूळ बातमी येथे वाचा – द व्हर्ज । अर्काइव्ह
मग आम्ही बीबीसीच्या मूळ व्हिडियोचा शोध घेतला. तेव्हा टॉप गियरच्या युट्यूब चॅनेलवर 2010 साली अपलोड करण्यात आलेला मूळ व्हिडियो सापडला. सुमारे तीन मिनिटांचा हा व्हिडियो खाली पाहू शकता. व्हिडियोसोबतच्या माहितीनुसार, मिसिसिपी येथे नासा स्पेस शटलच्या सॉलिड रॉकेट बूस्टर्सची चाचणी घेण्यात आली होती. तेथे जेरेमी क्लार्कसन यांनी हा एपिसोड केला होता. अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यासाठी सुमारे 18 लाख लिटर इंधन लागते.
संपूर्ण व्हिडियो पाहिल्यावर कळते की, रॉकेट इंजिनच्या चाचणीतून हे पांढरे ढग तयार झाले होते. रॉकेट इंजिनमध्ये द्रव हायड्रोजन आणि द्रव ऑक्सिजनच्या इंधनाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे यातून बाहेर पडलेला धूर म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मिश्रण, अर्थातच पाण्याची वाफ असते. त्यामुळे त्याला थंड हवा लागल्यावर पाऊस पडण्याची शक्याता असते.
नासाच्या अधिकृत वेबसाईटवर स्पेसल लाँच सिस्टमविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दूरवरच्या अंतराळ प्रवासात अंतराळयानामध्ये या शक्तीशाली रॉकेटचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांची चाचणी घेणे आवश्यक असतात. 2017 मध्ये नासाने RS-25 फ्लाईट इंजिनची चाचणी घेतली होती. याचाच व्हिडियो व्हायरल क्लिपच्या सुरुवातीला दिसतो. मूळ व्हिडियो नासाच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.
एवढेच नाही तर या चाचणीचा 360 अंश डिग्री अनुभव घ्यायचा असेल तर खाली दिलेला व्हिडियो पाहा. नासाच्या मार्शल स्पेस फ्लाईट सेंटरच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडियो अपलोड करण्यात आला होता. यातून कळते की, व्हायरल क्लिपमध्ये दिसणारी मशीन मूळात रॉकेट इंजिन आहे. चाचणीदरम्यान त्यातून हा पांढराशुभ्र धूर बाहेर पडतो.
निष्कर्ष
फेसबुकवर पसरविली जाणारी क्लिप बीबीसीच्या टॉप गियर कार्यक्रम आणि RS-25 रॉकेट इंजिनची चाचणीचा व्हिडियो एकत्र करून तयार करण्यात आली आहे. ही पावसाचे ढग तयार करणारी मशीन नाही. नासाच्या स्पेस लाँचिंग सिस्टमधील RS-28 आणी RS-25 रॉकेटची चाचणी आहे. त्यामुळे नासाने पावसाळी ढग तयार करण्याचे तंत्रज्ञान निर्माण केल्याचा दावा असत्य आहे.

Title:VIDEO: नासाने पावसाचे ढग तयार करणारी मशीन बनवलेली नाही. हा रॉकेट चाचणीचा व्हिडियो आहे.
Fact Check By: Mayur DeokarResult: False
