संजय राऊत यांनी ‘मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट’ करण्याबाबत वक्तव्यामागील वस्तुस्थिती काय ? वाचा सत्य

Altered राजकीय | Political

सध्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही राजकीय वर्चस्वाची लढाई ठरते, त्यामुळे ठाकरे गट आणि सत्ताधारी पक्ष आमनेसामने आहेत.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की,  “मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, बाकी इतरत्र नाही.” 

दावा केला जात आहे की, या ठिकाणी संजय राऊत मुंबईतील मराठी माणसाप्रती स्वत:च्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळात संजय राऊत सत्ताधारी भाजप व शिंदेसेनेच्या महायुतीला मुंबईतील मराठी माणसाचा विरोधक सांगतात.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये संजय राऊत म्हणतात की, “मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, बाकी इतरत्र नाही.”

व्हिडिओमधील ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “कधी नव्हे ते खरं बोलले ! संजय राऊतांनी उघड केला डाव… मुंबई विकून मराठी माणसाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र..”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मुंबई विकून मराठी माणसाचं अस्तित्व संपवण्याचा यांचा डाव आहे… मुंबईकर यंदा विचार करून मतदान करा!”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट असून संजय राऊत यांनी एका पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यातील एक भाग आहे.

टीव्ही-9 मराठीने 23 ऑक्टोबर रोजी आपल्या युट्यूब चॅनलवर या पत्रकार परिषदेचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला होता.

संपूर्ण पत्रकार परिषद पाहिल्यानंतर लक्षात येते की, संजय राऊत यांनी “मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, बाकी इतरत्र नाही” हे वक्तव्य भाजप व शिंदेसेनेला संबोधून म्हटले होते.

वरील व्हिडिओमध्ये 8:15 मिनिटावर एक पत्रकार संजय राऊत यांचे मत विचारण्यापूर्वी सांगतो की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुती (भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट) एकत्र लढणार असे विधान केले आहे. तसेच ठाणे, पिंपरी चिंचवड, पुणे वेगवेगळे लढण्याबाबत महायुतीत चर्चा सुरू आहे.

याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, “हा त्यांच्या गटाचा निर्णय आहे. पण या सगळ्यांचे लक्ष्य मुंबई आहे. मुंबईतून मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत. बाकी इतरत्र नाही. मुंबईत शिवसेनेचा पराभव घडवणे म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणे या विषयी त्यांच्यात एकमत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने जो भगवा झेंडा कायम मुंबईवर फडकवत ठेवला तो उतरवणे हे यांचे अंतिम ध्येय आहे आणि त्याच्यामुळे ते इथे एकत्र यायला तयार आहेत.”

हेच वक्तव्य आपण येथेयेथे वाचू शकता.

अर्थात मूळ व्हिडिओ एडिट करुन अर्धवट वक्तव्य पसरवले जात आहे.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात खासदार संजय राऊत स्वपक्षाला मुंबईतील मराठी माणसाचा विरोधी म्हणाले नाही, तर सत्ताधारी पक्षाला म्हणाले होते. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटरयेथे फॉलो करा.)

Avatar

Title:संजय राऊत यांनी ‘मराठी माणसाचे अस्तित्व नष्ट’ करण्याबाबत वक्तव्यामागील वस्तुस्थिती काय ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Altered


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *