
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्व पक्ष नेत्यांनी प्रचाराचे नारळ फोडले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुढारी न्यूज चॅनलचे एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या स्क्रिनशॉट सोबत दावा केला जात आहे की, संजय राऊत यांनी घोषणा केली की, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर लाडकी बहिण योजनेद्वारे हिंदू महिलांना दुप्पट तर मुस्लिम महिलांना चौप्पट पैसे देण्यात येईल.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा स्क्रिनशॉट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल स्क्रिनशॉट बनावट असून पुढारी न्यूज चॅनलने अशी कोणती बातमी जारी केलेली नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये आपण पुढारी न्यूज चॅनलचे लोगो आणि संजय राऊत दिसतात. सोबत ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “उद्धव ठाकरे परत मुख्यमंत्री झाल्यावर लाडक्या बहिणीला ३०००/- रुपये देणार. तसेच मुस्लिम भगिंनीची प्रजननज क्षमता जास्त असल्यामुळे त्यांना पौष्टिक आहार योजने अंतर्गत महीना ६०००/- रुपये देणार.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
संजय राऊत यांनी खरंच त्यांचे सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवण्याची घोषणा केली असती, तर ही नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी कोणतीही अधिकृत व विश्वासार्ह बातमी आढळून येत नाही.
तसेच व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये पाहिल्यावर ‘गडचिरोलीमध्ये दोन महिन्यातच रांगी आरोग्य केंद्राला गळती’ची बातमी दिसते. सर्च केल्यावर कळाले की, ही बातमी 3 महिन्यापुर्वीची आहे.
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर व्हायरल स्क्रिनशॉटशी मिळता-जुळता व्हिडिओ सापडला.
पुढारी न्यूजने 28 जुलै रोजी हा व्हिडिओ युट्यूब चॅनलवर शेअर केला होता.
या व्हिडिओमध्ये 2:59 मिनिटावर संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या बद्दल बोलतांना दिसतात. संपुर्ण पत्रकार परिषद येथे पाहू शकता.
खालील फोटोमधील तुलना पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, दोन्ही स्क्रिनशॉटमधील संजय राऊत यांच्या समोरील एएनआयचा माईक आणि माघिल व्यक्ती समान जागेवर आहेत.
पुढारीचे खंडण
फॅक्ट क्रेसेंडोने ‘पुढारी न्यूज’ चॅनेलचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी सांगितले की, “व्हायरल स्क्रिनशॉट बनावट असून त्यामधिल फॉन्ट पुढारीचे नाही. तसेच पुढारी न्यूज चॅनलने अशी कोणतीही बातमी जारी केली नाही.”
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल स्क्रिनशॉट बनावट असून पुढारी न्यूज चॅनलने अशी कोणती बातमी जारी केलेली नाही. संजय राऊत यांनी सत्तेत आल्यावर लाडकी बहिण योजनेद्वारे महिलाना वाढिव रक्कम देण्याची घोषणा केली नाही. खोट्या दाव्यासह स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:पुढारीचे स्क्रिनशॉट वापरुन संजय राऊत यांच्या संदर्भात फेक न्यूज व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Altered
