
सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण, पोषक आहार, पुस्तके आणि मोफत गणवेश अशा विविध सवलती उपलब्ध करूनही त्या सर्व घटकांपर्यंत पोहचत नसल्याचा तक्रार नेहमीच केली जाते. याचेच उदाहरण म्हणून शाळेच्या बाकावर फाटक्या कपड्यांमध्ये बसून शिकणाऱ्या एका मुलाचा फोटो शेअर होत आहे. हा फोटो भारतातील सरकारी शाळांची दयनीय स्थिती दर्शवित असल्याचा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
आमच्या पडताळणीत हा दावा खोटा आढळला आहे. हा फोटो भारतातील नसून कंबोडियामधील आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये काही विद्यार्थी बाकावर बसून शिकत आहेत. शेवटच्या बाकावरील एका मुलाचे कपडे फाटलेले आहे. दावा केला जात आहे की, हा फोटो भारतातील आहे.
समाजवादी पक्षाचे नेते आई. पी. सिंह यांच्या कथित ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला जात असून त्यात त्यांनी नरेंद्र मोदींना उद्देशून म्हटले होते की, “प्रधानमंत्री आपण कोणता भारत घडवत आहात? जिथे लहान मुलांना शरीर झाकण्यासाठी कपडे देखील नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक

मूळ पोस्ट – ट्विटर
तथ्य पडताळणी
गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले असता कळाले की, हा फोटो 2015 रोजी पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. Post Khmer या वेबसाईटवरील बातमीनुसार, हा फोटो कंबोडिया या देशातील एका शाळेचा आहे.
कंबोडियामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची संख्येत घट होत असल्या कारणामुळे तेथील सरकारने पहिली ते बारावीपर्यंतच्या गरीब विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला होता. या पूर्वी निम्म्या माध्यमिक शाळकरी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिले जात होती. या बातमीसोबत व्हायरल होत असलेला फोटो आपण खाली पाहू शकतो.

अधिक सर्च केल्यावर याच शाळेचे इतर फोटो फेसबुकवर आढळले. 2016 साली शेअर केलेल्या या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही कंबोडियामधील सांबो जिल्ह्याच्या क्रेटी प्रांतातील शाळा आहे. येथे अत्यंत गरीब विद्यार्थी शिक्षण घेतात.

मूळ फोटो – फेसबुक
यापूर्वीदेखील हा फोटो विविध ठिकाणांच्या नावाने व्हायरल झाला होता. त्यावेळी Cekfakta या कंबोडियन फॅक्ट-चेक वेबसाईटने त्याचे सत्य समोर आणले होते.
निष्कर्ष
या वरुन सिद्ध होते की, फाटक्या कपड्यामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा फोटो भारतातील नाही. हा फोटो कंबोडियामधील एका गावातील शाळेचा आहे. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:फाटक्या कपड्यातील विद्यार्थ्याचा फोटो खरंच भारतातील आहे का ? वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Missing Context
