
वादाच्या भोवऱ्यात सापडेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेविषयी विविध दावे केले जात आहेत. अशाच एका व्हायरल पोस्टमध्ये मैदानावरील आगीचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ कतारमधील फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यानचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पाडताळणीअंती हा दावा खोटा असल्याचे कळले आहे. हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वी जर्मनीतील फुटबॉल स्टेडियमध्ये प्रेक्षकांनी लावलेल्या आगीचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये फुटबॉल स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान काही प्रेक्षक मैदानावर आगेचे गोळे फेकताना दिसतात. यूजर्स लिहितात की, “कतारमध्ये फिफा विश्वचषक स्टेडियममध्ये भयानक आग लागली. आग इतकी मोठी आणि घातक होती की, पूर्ण कतारमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आले.”
मूळ पोस्ट – फेसबुक | अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हायरल होत आसलेल्या व्हिडिओला गुगल रिव्हर्स ईमेज सर्च केल्यावर कळाले की, हा चार वर्षांपूर्वीचा जर्मनीतील व्हिडिओ आहे.
एक्सप्रेसच्या बातमीनुसार 12 मे 2018 रोजी जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरातील फुटबॉल स्टेडियममध्ये Hamburger SV (HSV) आणि Borussia Moenchecngladbach या संघांच्या सामन्यात HSV चाहात्यांनी मैदानावर आगीचे गोळे फेकले होते.

जर्मनीतील बुंदेसलीगा स्पर्धतून HSV संघ बाद झाल्यामुळे नाराज चाहत्यांनी मैदानावरच गोंधळ घालत जाळपोळ केली होती. यामुळे सुरू असलेला सामना काही काळासाठी थांबवावा लागला होता.
सामना संपत आला तेव्हा प्रेक्षकांनी मैदानावर फटाके भिरकावले. त्यामुळे आग लागून सगळीकडे धुराचे लोट पसरले. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
जर्मन वृत्तसंस्था डीडब्लूने या घटनेचा शेअर केलेला व्हिडिओ खाली पाहू शकता.
कतारमध्ये लागली आग
हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार 26 नेव्हेंबर रोजी फिफा विश्वचषक “फॅन व्हिलेज” परिसराजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग लागली होती. पेट घेतलेल्या इमारतीतून धूर निघतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
ही आग मैदानात लागली नव्हती. तसेच संतप्त प्रेक्षकांनीसुद्धा ही आग लावली नव्हती.

निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, फुटबॉल मैदानावर लागलेल्या आगीचा व्हिडिओ कतारमधील नाही. तो व्हिडिओ जर्मनीतील हॅम्बर्ग शहरातील मैदानाचा असून चार वर्षांपूर्वी संतप्त प्रेक्षकांनी अशी जाळपोळ केली होती.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:फिफा विश्वचषकात प्रेक्षकांनी मैदानावर आग लावली का? जुना व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
