उत्तर प्रदेशमध्ये PET परीक्षेसाठी विद्यार्थी रेल्वेला लटकून गेले का? जुना व्हिडिओ व्हायरल

दिशाभूल करणाऱ्या I Misleading राजकीय | Political

नुकतीच उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली. सुमारे 37 लाख उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वेला बाहेरून लटकून जाणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील केंद्रावर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून परीक्षा देण्यासाठी जावे लागले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. 

अमच्या पडताळीणीमध्ये हा दावा खोटा आढळला. हा व्हिडिओ जुना असून, उत्तर प्रदेशमधीलसुद्धा नाही. 

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसेत की, डब्याच्या बाहेर लोक लटकून प्रवास करीत आहेत. काही जण तर रेल्वे इंजिनलासुद्धा लटकलेले आहेत. सोबत म्हटले की, ‘‘हा व्हिडिओ प्रयागराजचा सांगितला जात आहे. PET परीक्षा देण्यासाठी उमेदवार जात होते. या प्रवासात कोणत्या विद्यार्थाचा अपघात झाला असता तर याला कोण जबाबदार ठरले असते?’’ 

फेसबुकआर्काइवफेसबुक

तथ्य पडताळणी 

व्हिडिओमधील कीफ्रेम्सला गुगल रिव्हर्स ईमेज सर्च केले असता त्यातून कळाले की, 2018 पासून हा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

युट्यूबवर हाच व्हिडिओ 2018 साली गया-पटना रेल्वेची गर्दी म्हणून शेअर करण्यात आला होता. 

म्हणजेच हा व्हिडिओ सुमारे चार वर्षे जुना आहे. सदरील व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारतर्फे याबाबत स्पष्टीकरण जारी करण्यात आले आहे. 

उत्तर प्रदेश प्रशासनाने व्हायरल दाव्याचे खंडन करीत सांगितले की, हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील नाही. तसेच याचा यूपी राज्यसेवा पूर्व परीक्षेशी (PET) काही संबंध नाही. 

एवढेच नाही तर, उत्तर मध्ये रेल्वे प्रशासनानेसुद्धा या व्हिडिओबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सदरील व्हिडिओमध्ये बोगी क्रमांक 40042 असणारी रेल्वे आज प्रयागराजमधून गेलेली नाही. या व्हिडिओचा आज पार पडलेल्या यूपी राज्यसेवा पूर्व परीक्षेशी काही संबंध नाही. 

यूपी PET परीक्षेमधील गोंधळ

15 आणि 16 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेश राज्य सेवा पूर्व परीक्षा (UPSSSC PET 2022) पार पडली. सुमारे 37 लाख उमेदवारांनी यासाठी अर्ज भरला होता. परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली. खचाखच भरलेल्या रेल्वे, बस, खासगी वाहनांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. प्रशासनाचे ढिसाळ नियोजन याला कारणीभूत असल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला..  

निष्कर्ष

यावरून असे सिद्ध होते की, दावा करण्यात आलेल्या रेल्वेचा व्हिडिओ चार वर्षे जुना आणि बिहारमधील आहे. चुकीची महितीसह तो उत्तर प्रदेश राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या संदर्भात शेअर करण्यात येत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:उत्तर प्रदेशमध्ये PET परीक्षेसाठी विद्यार्थी रेल्वेला लटकून गेले का? जुना व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: Fact Crescendo Team  

Result: False