
कोरोना विषाणूचा उगम आणि अस्तित्व याविषयी सोशल मीडियावर धदांत खोटे दावे आणि माहिती पसरविली जाते. त्यात भर म्हणून आणखी एक मेसेज व्हायरल होत आहे.
सिंगापुर जागितक आरोग्य संघटनेची (WHO) बंदी धुडकावून लावत कोविडमुळे मृत पावलेल्या रुग्णांचे शवविच्छेदन केले आणि त्यातून कळाले की, कोरोना हा काही विषाणू नसून एक साधा जीवाणू आहे, असा मेसेजमध्ये दावा केलेला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा मेसेज व अर्ज आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणी अंती कळाले की, हा मेसेज पूर्णतः खोटा असून, रशियाने असा कोणताही शोध लावलेला नाही.
काय आहे दावा?

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
गेल्यावर्षी अशाच आशयाचा मेसेज इटली आणि रशियाच्या नावाने व्हायरल झाला होता. फॅक्ट क्रेसेंडोने त्यावेळीसुद्धा याची पडताळणी करून सत्य समोर आणले होते.
या मेसेजमधील एका-एका दाव्याची पडताळणी करूया.
दावा क्र. 1 – WHO ने कोविड-19 रुग्णांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करण्यावर बंदी घातलेली आहे
सत्य – जागतिका आरोग्य संघटनेकडे (WHO) अशी बंदी किंवा नियम तयार करण्याचा अधिकारच नाही. उलटपक्षी, WHO ने 4 सप्टेंबर 2020 रोजी कोविड-19 रुग्णांचे शवविच्छेदन कसे करायचे याचे अद्यायावत मार्गदर्शन प्रकाशित केलेले आहे. त्यामुळे हे विधान चूक आहे. WHO चा प्रोटोकॉल तोडून सिंगापूरने प्रोटोकॉल धडुकावून शवविच्छेदन केले, याला काही अर्थ नाही.
दावा क्र. 2 – सिंगापूर हा कोविड-19 रुग्णांचे शवविच्छेदन करणारा जगातील पहिला देश ठरला
सत्य – हे विधान चूक आहे. अमेरिका, इंग्लंड, इटली यासह इतर देशांमध्ये फेब्रुवारी 2020 पासून कोविड-19 रुग्णांचे शविच्छेदन होत आहे.
दावा क्र. 3 – कोविड-19 हा विषाणू म्हणून अस्तित्वात नाही; तो एक बॅक्टेरिया आहे
सत्य – हे विधान पूर्णतः असत्य आहे. कोरोना हा विषाणूच (व्हायरस) आहे. जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल लॅन्सेटने कोरोना व्हायरसच्या जिनोम सिक्वेन्सविषयी प्रबंध प्रसिद्ध केला होता. यात स्पष्टपणे विषाणू म्हटले आहे.

जागितक आरोग्य संघटनेनेसुद्धा कोरोनाला विषाणूच म्हटले आहे. Covid-19 या शब्दात CO ही अक्षरे कोरोना या शब्दाचे लघुरूप आहेत, VI म्हणजे व्हायरस किंवा विषाणू, D म्हणजे डिसीज किंवा आजार आणि 19 हा आकडा 2019 या वर्षाचा निर्देश करतो.
दावा क्र. 4 – कोविड-19 मुळे रक्त गोठून मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे लोक मरतात
सत्य – कोरोनाची लागण झाल्यावर रुग्णांच्या शरीरात विविध कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यात रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठळ्या (Thrombosis) तयार होण्याचा धोकादेखील असतो.
जॉन हॉपकिन्सच्या तज्ञांनुसार, कोविडमुळे फुफ्फुस, पाय आणि इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे आढळले आहे.
रक्त गोठल्यामुळे रक्तप्रवाह थांबून अवयवांना पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. कोवडिमुळे श्वसनसंस्था निकामी होऊन मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे विधान बऱ्याच अंशी सत्य आहे.
दावा क्र. 5 – कोविड-19 या आजाराच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर आणि आयसीयूची कधीच आवश्यक नसते
सत्य – फॅक्ट क्रेसेंडोशी बोलताना दिल्लीच्या एलएनजीपी रुग्णालयातील डॉ. हीरा म्हणाल्या होत्या की, सगळ्याच कोविड-19 रुग्णांना व्हेंटिलेटर किंवा आयुसीयू लागत नाही. परंतु, कोरोनामुळे श्वसनास त्रास होऊ लागल्यावर किंवा विविध अंगे निकामी झाल्यावर व्हेंटिलेटर आणि आयसीयू अत्यावश्य असते. त्यामुळे त्यांची गरज नाही हे विधान करणे चुकीचे ठरेल.
दावा क्र. 6 – लवकर बरे होण्यासाठी प्रतिजैविक गोळ्या, दाहक विरोधी आणि अँटीकोग्युलंट घ्याव्यात
सत्य – कोरोनावर उपचार करताना दाहविरोधी (anti-inflammatory) आणि रक्त गोठण्याची क्रिया थांबवणारी (anti-coagulants) औषधी काही प्रमाणात वापरू शकतो.
‘जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजी’मध्ये (JACC) प्रकाशित लेखानुसार, दवाखान्यात भरती झालेल्या कोविड-19 रुग्णांसाठी रक्त गोठण्याची क्रिया थांबवणाऱ्या औषधांचा वापर त्यांचे साईट इफेक्ट पाहूनच करावा.
दाहविरोधी औषधांविषयीसुद्धा इंग्लंडच्या आरोग्य विभागाने असाच सल्ला दिलेला आहे.
जसे वर नमूद केले आहे, कोविड-19 हा कोरोना विषाणूमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे प्रतिजैविक गोळ्या (anti-biotics) कोविड-19 वर काही उपयोगाच्या नाही. प्रतिजैविक गोळ्या (anti-biotics) केवळ बॅक्टेरियामुळे होणाऱ्या आजारांवर परिणामकारक ठरतात.
जागितक आरोग्य संघटनेनेसुद्धा स्पष्ट केले आहे की, कोरोनाव्हायरसची लागण झाल्यावर अँटीबायोटिक्स गोळ्या घेऊ नये.

दावा क्र. 7 – 5-जी रेडिएशनमुळे कोरोनाचे बॅक्टेरिओ सक्रीय होतो
सत्य – हा दावा धदांत खोटा आहे. 5-जी मोबाईल रेडिएशनमुळे कोरोना होत नाही. जागतिक आरोग्य संघटनेने याविषयी स्पष्टीकरण दिलेले आहे.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, हा व्हायरल मेसेज निव्वळ अफवा आहे. सिंगापूरच्या आरोग्य विभागाने असा कोणताही खुलासा केलेला नाही. कोरोना हा विषाणूच आहे. त्यामुळे मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लस घ्या. कोरोनाविषयक इतर फॅक्ट चेक येथे वाचू शकता.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:सिंगापूर सरकारने रुग्णांचे शवविच्छेदन करून कोरोना विषाणू अस्तित्वात नसल्याचे म्हटले का?
Fact Check By: Agastya DeokarResult: False
