
मुस्लिम तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन देशातील विविध क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व वाढवावे, असे आवाहन करणारा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, मुस्लिमांना प्रवृत्त करणारा हा व्यक्ती हिमालया कंपनीचे मालक “मोहम्मद” आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉट्सअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून सत्यतेबाबत विचारणा केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हिडिओतील व्यक्ती हिमालया कंपनीची मालक नाही.
काय आहे दावा?
साडेतीन मिनिटांच्या व्हिडिओमध्ये एक सूट घातलेला एक जण म्हणतो की, “मुस्लिम तरुणांनी बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर बांधण्याला विरोध करण्याऐवजी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. देशातील मदरशांनी दरवर्षी हजारो डॉक्टर, इंजिनिअर्स, पोलिस, आयएएस अधिकारी निर्माण करण्याचे लक्ष्य निर्धारीत केले पाहिजे. मुस्लिमांना जर या देशा टीकायचे असेल शैक्षणिक प्रगती करावीच लागेल.”
कॅप्शनमध्ये म्हटले की, “हे हिमालया Drug कंपनीचे मालक आहेत…मोहम्मद …विचार करा”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम या व्हिडिओतील व्यक्ती कोण याचा शोध घेतला. त्यासाठी व्हिडिओतील की-फ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, हा व्हिडिओ नकी अहमद नडवी नामक व्यक्तीचा आहे.
त्याच्या युट्यूब चॅनेलवर 20 ऑक्टोबर 2020 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. मूळ 12 मिनिटांचा हा व्हिडिओ आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बमुळे पूर्णतः नष्ट झालेल्या जपानच्या प्रगतीचे उदाहरण देत नकी यांनी मुस्लिम तरुणांना उच्च शिक्षण घेण्याची गरज का आहे हे या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
व्हायरल क्लिपमधील भाग आपण 9.00 मिनिटांपासून पाहू शकता.
नकी यांचा हिमालया कंपनीशी काही संबंध आहे का हे शोधले. त्यांचे ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक आणि लिंक्डइन प्रोपाईलची तपासणी केली असता कुठेही हिमालया कंपनीचा उल्लेख किंवा त्यांचा संबंध आढळला नाही.
मूळ व्हिडिओतून साडेतीन मिनिटांची क्लिप व्हायरल झाल्यानंतर नकी यांनी गेल्या आठवड्यात खुलासादेखील केला.
या व्हिडिओचा उद्देश धार्मिक तेढ निर्माण करून मुस्लिम तरुणांना भडविण्याचा नव्हता. केवळ शैक्षणिक दृष्टीकोन समाजात रुजावा या हेतून तो तयार केला होता.
हिमालया कंपनीचे मालक कोण?
एम. मेनल असे हिमालया कंपनीच्या संस्थापकाचे नाव आहे. 1934 साली त्यांनी ही कंपनी स्थापन केली होती. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, सध्या मेराज मेनल कंपनीचे चेअरमन आहेत आणि शैलेंद्र मल्होत्रा हे ग्लोबल सीईओ आहेत. तसेच मेराज यांचा मुलगा नबील हेसुद्धा कंपनीचे काम पाहतात.
कंपनीच्या वरीष्ठ कर्मचारी मंडळामध्ये साकेत गोरे (सिंगापूर सीईओ), जतीन ब्रह्मेचा (ग्लोबल सीएफओ), जयश्री उल्लाल (फायनान्स), केजी उमेश (एचआर) यांचा समावेश आहे.
हिमालया कंपनीच्या लीडरशीपमध्ये नकी अहमद नडवी यांचे नाव नाही.
मूळ वेबसाईट – हिमालया ड्रग कंपनी
कंपनीच्या नावे गेल्या वर्षीदेखील अपप्रचार पसरविण्यात आला होता. तेव्हादेखील कंपनीतर्फे खुलासा करण्यात आला होता की, हिमालया कंपनी पूर्णतः स्वदेशी उद्योग असून 1930 पासून आरोग्य क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी राहिलेली आहे. सोशल मीडियावर कंपनीचे नाव बदनाम करण्यासाठी चुकीचे व निराधार मेसेज पसरविले जात असून, वाचकांनी त्यावर विश्वास ठेवू नये.
आतादेखील हा व्हिडिओ व्हायरल होऊ लागल्यानंतर कंपनीने ट्विट केले की, कंपनीविरोधात सोशल मीडियावर फिरत असलेले मेसेज फेक आहेत. कोणीही जर असे व्हिडिओ पसरवित असेल तर त्यांनी त्वरीत ते डिलीट करावे. अन्यथा कंपनीला कायदेशीर कारवाई करावी लागेल.
निष्कर्ष
मुस्लिम तरुणांना शिक्षणासाठी उद्युक्त करणारा ती व्यक्ती हिमालया कंपनीची मालक नाही. त्याचे नाव नकी अहमद नडवी असून त्याचा हिमालया कंपनीशी काही संबंध नाही.

Title:मुस्लिम तरुणांना प्रवृत्त करणारी ही व्यक्ती हिमालया कंपनीची मालक नाही; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
