काँग्रेसच्या गोवा सोशल मीडिया प्रमुख महिलेचा फोटो ‘हाथरस भाभी’ असल्याचा दावा खोटा

False राजकीय | Political

जबलपूर येथील एक महिला नातेवाईक नसतानाही हाथरस येथील पीडितेच्या घरी राहिल्यामुळे ती चर्चेत आली आहे. ‘हाथरस भाभी’ म्हणून या महिलेला संबोधले जात आहे. 

सोशल मीडियावर आता काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांच्यासोबत एका महिलेचा फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ही कथित ‘हाथरस भाभी’ काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा असत्य आढळला.

काय आहे दावा?

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ आणि गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि एक महिला पत्रकार परिषदेत असतानाचा फोटो शेयर करून म्हटले की, “हाथरस येथे नकली भाभी बनून ज्या नक्सली राजकुमारी बंसलने धुमाकूळ घातला होता तिला काल काँग्रेसचे एक राष्ट्रीय प्रवक्ते गौतम वल्लभ व गोवा काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्याबरोबर गोव्यातील एका सभेत पाहिले गेले आहे.

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम ही महिला कोण आहे हे जाणून घेण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, या महिलेचे नाव प्रतिभा बोरकर असे आहे. त्या काँग्रेस गोव्याच्या सोशल मीडिया प्रमुख आहेत. 

गोवा काँग्रेसच्या फेसबुक पेजवरून गेल्यावर्षी 29 सप्टेंबर 2019 रोजी या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ लाईव्ह प्रक्षेपित करण्यात आला होता. 

मूळ पोस्ट – फेसबुक

सदरील प्रतिभा बोरकर यांचा फोटो ‘हाथरस भाभी’ म्हणून व्हायरल होऊ लागल्यानंतर गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी ट्विट करून माहिती दिली की, प्रतिभा बोरकर यांनी सोशल मीडियावरील खोट्या प्रचारविरोधात गोव्याचे पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली आहे.

बोरकर यांच्या तक्रारीची प्रत शेयर करीत त्यांनी लिहिले की, काँग्रेस गोव्याच्या कार्यकर्त्या प्रतिभा बोरकर यांचा फोटो ‘हाथरस भाभी’ म्हणून शेयर करण्याइतपत भाजप पक्ष तळाला गेला आहे. गोवा पोलिस आणि सायबर क्राईमकडे याबाबत तक्रार केली असून, आता पोलिस एका महिलेच्या सन्मानासाठी किती तत्पर काम करतात याकडे लक्ष आहे.

अर्काइव्ह

प्रतिभा बोरकर यांनीसुद्धा हे रिट्विट केले आहे. त्यांच्या फेसबुक अकाउंटवर सदरील फोटो कव्हर म्हणून ठेवलेला आहे. 

कोण आहेत ‘हाथरस भाभी’?

डॉ. राजकुमारी बंसल या जबलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. हाथरस पीडितेच्या घरी दोन दिवस राहिल्या होत्या. अनेकांना त्या पीडितेच्या नातेवाईक वाटले. तेथे त्या मीडियासह अनेक राजकीय नेत्यांशी बोलतानाचा फोटो आणि व्हिडिओ समोरल आल्यानंतर त्या चर्चेत आल्या. त्यानंतर कळाले की, त्या नातेवाईक नाहीत. त्यांच्यावर आरोप करण्यात आला की, त्या पीडितेच्या कुटुंबियांना काय बोलायचे, काय नाही हे शिकवत होत्या. 

डॉ. राजकुमारी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणाल्या की, हाथरस पीडितेची बातमी पाहून मला राहावले नाही आणि मी जबलपूरहून थेट हाथरसला पीडित कुटुंबियांना आधार देण्यासाठी आले. यामागे कोणत्याही राजकीय पक्षाचा हात किंवा हेतू नाही. केवळ मानवतेच्या भावनेतून मी हाथरसला गेले होते.

अर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, डॉ. राजकुमारी बंसल या जबलपूर (मध्य प्रदेश) येथील आहेत. व्हायरल होत असलेला फोटो पणजी (गोवा) येथील काँग्रेस कार्यकर्त्या प्रतिभा बोरकर यांचा आहे. त्यांचा फोटो चुकीच्या माहितीसह हाथरस भाभी यांच्या नावे व्हायरल होत आहे. 

Avatar

Title:काँग्रेसच्या गोवा सोशल मीडिया प्रमुख महिलेचा फोटो ‘हाथरस भाभी’ असल्याचा दावा खोटा

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False