
तीन तरुण आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दोन पुरुष व एका महिला अधिकाऱ्याच्या या फोटोवरून दावा केला जात आहे की, एकाच कुटुंबातील हे तिघे भावंड आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, हे तिघे एकमेकांचे भाऊ-बहिण नाहीत.
काय आहे दावा?

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम सदरील फोटो रिव्हर्स इमेज सर्च केले. हा फोटो ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अनेक वेळा शेयर केल्याचे दिसले. त्यातून शोधत गेलो असता इन्स्टाग्रामवर तुषार गुप्ता नामक युजरने हा फोटो शेयर केल्याचे आढळले. त्यांच्या प्रोफाईलमधील माहितीनुसार ते 2018 सालच्या पंजाब केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी 113 वा रँक मिळवला होता.
मूळ फोटो येथे पाहा – तुषार गुप्ता इन्स्टाग्राम
तुषार यांनी या फोटोमध्ये ShrutSom आणि Pooja Vashisht या दोघांना टॅग केलेले आहे. त्या दोघांच्या प्रोफाईलवर जाऊन तपास केला असता कळाले की, ते दोघेसुद्धा आयपीएस अधिकारी आहेत. त्यांची नावे अनुक्रमे श्रुत किर्ती सोमवंशी (बॅच 2018, रँक 157) आणि पूजा वशिष्ठ (बॅच 2018, रँक 111) अशी आहेत.
पूजा यांनीदेखील 22 ऑगस्ट रोजी हाच फोटो शेयर केला होता. हा फोटो हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल पोलिस अकादमी येथे काढण्यात आला होता.
मूळ फोटो येथे पाहा – पूजा वशिष्ठ इन्स्टाग्राम
पूजा वशिष्ठ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या फोटो विषयी केले जात असलेले व्हायरल दावे खोटे असल्याचे सांगितले आहे. त्यांनी श्रुत किर्ती सोमवंशी यांची पोस्ट शेयर करीत म्हटले की, “नाते रक्ताचे नसले तरी खाकी वर्दीचे आहे.”

आयपीएसच्या वेबसाईटवरील 19 डिसेंबर 2018 रोजीच्या अधिसूचनेमध्ये त्यावर्षीच्या आयपीएस अधिकाऱ्यांना त्यांचे कॅडर वाटपाची यादी दिलेली आहे. यामध्ये व्हायरल फोटोतील तीन्ही आयपीएस अधिकाऱ्यांची नावे आहेत. यावरून स्पष्ट दिसते की, या तिघांची आडनावे वेगळी असून तुषार पंजाबचे, पूजा हरियाणाच्या तर श्रुत कीर्ती उत्तर प्रदेशमधील आहेत.

मूळ नोटिफिकेशन येथे पाहा – आयपीएस वेबसाईट
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या फोटोविषयी करण्यात येणारा दावा खोटा आहे. ते तिघे एकाच कुटुंबातील भाऊ-बहिण नाहीत.

Title:या फोटोतील तीन IPS अधिकारी एकाच घरातील भाऊ-बहिण नाहीत; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
