
मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावे सध्या एक ऑडियो क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये त्या कथितरीत्या लोकांना कोरोनाच्या उपचारासाठी डॉक्टरांकडे न जाण्याचे आवाहन करीत आहेत. केंद्राकडून मिळणारा पैसा कमवण्यासाठी दवाखाने सामान्य रुग्णांनादेखील कोरोना पेशंट दाखवित असल्याचा दावा या क्लिपमध्ये करण्यात आला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही क्लिप व्हॉट्सअपवर पाठवून तिची पडताळणी करण्याची विनंती केली. तथ्य पडताळणीअंती असे समोर आले की, गीता जैन यांनी अशी कोणतीही क्लिप तयार केलेली नसून, त्यांच्या नावे खोटा मेसेज फिरत आहे.
काय आहे क्लिपमध्ये?

दोन मिनिटांच्या या ऑडियो क्लिपमध्ये एक महिला म्हणते की, “केंद्राकडून कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेला प्रत्येकी दीड लाख रुपये देण्यात येतात. हा पैसा मिळवण्यासाठी डॉक्टर सर्दी-खोकल्याच्या रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह दाखवत आहेत. त्यामुळे सर्दी-खोकला झाला असेल तर घरीच कोमट पाणी, काढे, मलेरियाच्या गोळ्या घेऊन उपचार करा. डॉक्टरांकडे किंवा टेस्टिंग लॅबमध्ये जाऊ नका. तरच यांचा गोरखधंदा बंद पडेल.”
ही ऑडियो क्लिप मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांची असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे.
मूळ क्लिप आपण खाली ऐकू शकता
तथ्य पडताळणी
क्लिप नीट ऐकल्यावर प्रश्न पडतो की, एखादा लोक प्रतिनिधी आणि तोदेखील आमदार लोकांना असे आवाहन का करेल? कोरोनाचे संकट जगभरात पसरलेले असताना, राज्य आणि केंद्र सरकार त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना एखादा आमदार कोरोनासाठी डॉक्टरांकडे जाऊ नका असे का सांगेल हा प्रश्न पडतो. तसेच ऑडियो क्लिपमध्ये कुठेही बोलणाऱ्या महिलेने स्वतःचे नाव सांगितलेले नाही.
त्यामुळे सर्वप्रथम गीता जैन यांनी अशी काही क्लिप तयार केली का याचा शोध घेतला. तेव्हा त्यांनी या क्लिपचे खंडन केल्याचे आढळले. त्यांच्या फेसबुक पेजवरून त्यांनी व्हिडियोद्वारे सांगितले की, माझ्या नावावर व्हायरल होत असलेली ऑडियो क्लिप खोटी आहे. मी अशी कोणतीही क्लिप तयार अथवा प्रसारित केलेली नाही. माझ्या नावे फेक ऑडियो क्लिप पसरविणाऱ्यांविरोधात मी सायबर पोलिसांकडे तक्रार केलेली आहे. दरम्यान, कोरोनापासून बचाव होण्यासाठी सरकारतर्फे जे निर्णय आणि नियम सांगितले जातात त्यांचे सक्तीने पालन करण्याचे मी सर्वांना आवाहन करते. तसेच माझ्या नावे जर पुन्हा असे मेसेज व्हायरल होऊ लागले तर माझ्याशी संपर्क करून त्याची खातरजमा करावी.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
एवढंच नाही तर गीत जैन यांनी पोलिसांकडे याबाबत केलेल्या तक्रारीचा अर्जदेखील सोशल मीडियावर शेयर केलेला आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्या नावाने एक ऑडिओ क्लिप संपूर्ण शहरात पाठवली जात असून, ती खोटी आहे. या ऑडिओ क्लिपविरोधात नवघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. असामाजिक तत्वांद्वारे विविध विषयांवरून माझे नाव खराब करण्याचा कट रचला जात आहे.”

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुक
कोविड-19 ही जागतिक महामारी असून, अशा अफवा किंवा अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवू नये. कोमट पाणी किंवा मलेरियाच्या गोळ्यांनी कोरोना बरा होत नाही. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध तयार झालेले नाही. त्यामुळे घरगुती उपचार घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
निष्कर्ष
आमदार गीता जैन यांनी लोकांना डॉक्टरांकडे न जाण्याचे आवाहन करणारी ऑडियो क्लिप जारी केलेली नाही. त्यांचे नावे तशी खोटी क्लिप फिरत आहे. त्यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रारदेखील केलेली आहे. त्यामुळे त्या क्लिपवर विश्वास ठेवू नये.

Title:मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या नावे कोरोनविषयक खोटी ऑडियो क्लिप व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
