
बुधवारी (3 जून) महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. सोशल मीडियावर ‘निसर्ग’ वादळामुळे घराची पत्रे आणि वृक्ष उन्मळून पडत असल्याचे अनेक व्हिडियो व्हायरल होऊ लागले. रायगड जिल्ह्यातील उरण येथे पोहचलेल्या ‘निसर्ग’ वादळाचा म्हणूनही एक व्हिडियो शेयर होऊ लागला ज्यामध्ये समुद्रातील पाणी आकाशात जात असताना दिसते.
फॅक्ट क्रेसेंडोने याविषयी पडताळणी केली असता, हा व्हिडियो जुना असल्याचे समोर आले.
काय आहे पोस्टमध्ये?
मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हायरल होत असलेल्या व्हिडियोतील की-फ्रेम निवडून रिव्हर्स इमेज सर्च केले असता हा व्हिडियो ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा नसल्याचे स्पष्ट झाले.
हा व्हिडियो सात महिन्यांपूर्वीपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. कल्याण क्रांती न्यूजद्वारे युट्यूबवर 25 ऑक्टोबर 2019 रोजी हा व्हिडियो अपलोड करण्यात आला होता.
व्हिडियोसोबतच्य माहितीनुसार, कर्नाटकमधील करवार किनारपट्टीजवळ मच्छिमारांनी अरबी समुद्रात हा व्हिडियो चित्रित केला होता. विद्याभारती युट्यूब चॅनेलवरदेखील हाच व्हिडियो तेव्हा शेयर करण्यात आला होता.
दिग्विजय न्यूजच्या फेसबुक पेजवरदेखील 25 ऑक्टोबर 2019 रोजी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, हा व्हिडियो करवार किनारपट्टीलगत चित्रित करण्यात आला होता.
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । फेसबुक
इंडिया टुडे आणि लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार, 25 ऑक्टोबर 2019 रोजी कर्नाटक येथे क्यार वादळाचे आगमन झाले होते. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण आणि गोवा किनारपट्टीला ‘क्यार’ या चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला होता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडियो आज बुधवारी 3 जून रोजी आलेल्या ‘निसर्ग’ वादळाचा किंवा उरण येथी नाही. हा व्हिडियो सात महिन्यांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. अर्थातच जुना व्हिडियो निसर्ग वादळाचा म्हणून शेयर केला जात आहे. हा व्हिडियो नेमका कुठला व कोणी काढला याबद्दल ठोस माहिती उपलब्ध झाली नाही. परंतु हा व्हिडियो निसर्ग वादळाचा नाही एवढे निश्चित आहे.

Title:2019 मधील जूना व्हिडियो उरणमधील ‘निसर्ग’ वादळाचा म्हणून व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
