
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचंड गर्दीचा एक फोटो शेअर केला जात आहे. सोबत दावा केला जात आहे की, डाव्या पक्षांच्या आघाडीने बंगालमध्ये घेतलेल्या प्रचारसभेतील गर्दीचा हा फोटो आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, हा फोटो दोन वर्षे जुना आहे.
काय आहे दावा?
सोशल मीडियावर 28 फेब्रुवारी 2021 रोजी प्रचंड गर्दीचा फोटो शेअर करीत दावा केला जात आहे की, ‘डाव्या आघाडीची बंगालमध्ये आज झालेली लाखोंची सभा!’

हा फोटो फेसबुकवर मोठ्या प्रमाणात याच दाव्यासह शेअर होत आहे.

तथ्य पडताळणी
हा फोटो नेमका कधीचा आहे हे शोधण्यासाठी गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. समोर आलेल्या परिणामांतून कळाले की, 2019 पासून हा फोटो इंटरनेटवर उपलब्ध आहे.
इंडिया कॉन्टेंट या वेबसाईटने 3 फेब्रुवारी 2019 रोजी प्रकाशित केलेल्या एका बातमीत हा फोटो वापरण्यात आला आहे. सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा फोटो कोलकाता शहरात डाव्या विचारणीच्या पक्षांनी एकत्र येत 3 फेब्रुवारी 2019 रोजी घेतलेल्या सभेचा आहे.
पिपल्स डिसपॅच या वेबसाईटनेदेखील हा व्हायरल फोटो प्रकाशित केला होता. त्यानुसार कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर हा सभा झाली होती.

लोकसभा निवडणुकादरम्यान बंगालमध्ये विविध डाव्या पक्षांनी भाजपविरोधात मोट बांधली होती. त्यानुसार, त्यांनी 3 फेब्रुवारी 2019 रोजी ब्रिगेड परेड मैदानावर ही प्रचारसभा घेतली होती.
या सभेचा व्हिडिओदेखील युट्यूबवर उपलब्ध आहे.
मग यंदा डाव्यांच्या सभेला किती गर्दी होती?
पश्चिम बंगालमध्ये रविवारी (28 फेब्रुवारी) काँग्रेस आणि डावे पक्षांच्या आघाडीने कोलकाता येथे सभा घेतली होती. ब्रिगेड परेड मैदानावर झालेल्या या सभेचे फोटो इंडिया टुडेने शेअर केलेले आहेत. ते तुम्ही खाली पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, दोन वर्षे जुना फोटो आताचा म्हणून व्हायरल होत आहे. कोलकातामध्ये डाव्या पक्षांनी 3 फेब्रुवारी 2019 रोजी घेतलेल्या सभेतील विराट गर्दीचा फोटो आताचा सांगत शेअर केला जात आहे.

Title:बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या सभेतील प्रचंड गर्दी म्हणून जुना फोटो व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Milina PatilResult: False
