अयोध्येतील रामाची मूर्ती पाहून या छायाचित्रकाराच्या डोळ्यात आनंदाश्रु आले का? वाचा सत्य

False Social

डोळे पाणावलेल्या एका छायाचित्रकाराचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, अयोध्या राम मंदिरामधील प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान रामाची मूर्ती पाहून हा छायाचित्रकार इतका भावूक झाला की त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळअंती कळाले की, व्हायरल दावा असत्य आहे. हा फोटो अयोध्येतील नसून पाच वर्षांपूर्वी यूएईमध्ये झालेल्या एका फुटबॉल सामन्यादरम्यानचा आहे.

काय आहे दावा?

डबडबलेल्या डोळ्यांनी कथितरीत्या अयोध्या राम मंदिरामधील मूर्तीचे फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराचा फोटो शेअर करून लिहिलेले आहे की, “फोटोग्राफरला फोटो काढता काढता रामराया दिसेनासा झाला… मग लक्षात आले… डोळे पार आश्रृंनी डबडबले होते… म्हणून त्याने‌ चेहरा वर केला अश्रू वाहून जाउंदेत म्हणून… तेव्हड्यात त्याला कोणीतरी आपल्या कॅमेरात टिपले…धन्य… कृतार्थ…अजुन काय पाहिजे…त्याला नक्कीच काहीतरी छान अनुभूती आली असावी त्या क्षणी.”

मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम व्हायरल फोटोलो गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून कळाले की, डोळ्यातून पाणी आलेल्या या छायाचित्रकाराचा फोटो 2019 मधील आहे. या फोटोत दिसणाऱ्या छायाचित्रकाराचे नाव मोहम्मद अल-अझ्झावी आहे. तो इराकचा नागरिक आहे. 

यूएई येथे जानेवारी 2019 मध्ये एएफसी एशियन कप 2019 ही फुटबॉल स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये 22 जानेवारी रोजी इराक आणि कतार यांच्यामध्ये सामना झाला होता. कतारने सामन्यात 1-0 अशी बाजी मारली. या सामन्यादरम्यान छायाचित्रकार मोहम्मद अल-अझ्झावी मैदानात उपस्थित होता. 

कतारकडून इराकी संघाचा पराभव पाहून छायाचित्रकार मोहम्मद रडला होता. त्याचे हे छायाचित्र त्यावेळी प्रचंड गाजले होते. एशियन कपच्या अधिकृत अकाउंटवरूनदेखील 24 जानेवारी 2019 रोजी हा फोटो शेअर करण्यात आला होता. 

ट्विटरअर्काइव्ह

अंतिम 16 संघाच्या फेरीत इराकचा पराभव झाल्यावर हा इराकी छायाचित्रकार भावूक झाला, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच फुटबॉल ट्विट नावाच्या एका अकाउंटवरून या छायाचित्रकाराचे इतर फोटोही शेयर करण्यात आले होते. ते तुम्ही खाली पाहू शकता.

ट्विटरअर्काइव्ह

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, पाच वर्षांपूर्वीचा असंबंधित फोटो अयोध्या राम मंदिराशी जोडण्यात येत आहे. भावूक झालेल्या या इराकी छायाचित्रकाराचा फोटो 2019 साली झालेल्या फुटबॉल सामान्यादरम्यानचा आहे. कतारने इराकी संघाचा पराभव केल्यानंतर छायाचित्रकार मोहम्मद अल-अझ्झावी यांना रडू कोसळले होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अयोध्येतील रामाची मूर्ती पाहून या छायाचित्रकाराच्या डोळ्यात आनंदाश्रु आले का? वाचा सत्य

Written By: Agastya Deokar 

Result: False