नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका खासदाराच्या नावे वादग्रस्त विधान व्हायरल होत आहे. ‘शेतकऱ्यांना मरू द्या’ असे वक्तव्य केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी केल्याची बातमी मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या बातमीचा स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईनवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती ही बातमी 2014 मधील असल्याचे समोर आले. त्यांचे जुने वक्तव्य सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडून संदर्भाशिवाय शेअर केले जात आहे.

काय आहे दावा?

“मरते हैं तो मरने दो किसानों को” अशा मथळ्याच्या बातमीचे कात्रण शेअर होत आहे. बातमीनुसार, भाजपचे खासदार संजय धोत्रे एका शेतकी कार्यक्रमात म्हटले की, “शेतकऱ्यांना जर मरायचे असेल तर त्याला मरू द्या. शेतकऱ्यांसाठी कितीही करा त्यांना कमीच वाटते. दर दुसऱ्या दिवशी कोणी ना कोणी आत्महत्या करतोय म्हटल्यावर सरकार सगळ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही. सरकारकडे दुसरी खूप कामे आहेत.”

मूळ पोस्ट – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

संजय धोत्रे यांच्या या विधानेच फॅक्ट क्रेसेंडोने गेल्यावर्षीसुद्धा फॅक्ट-चेक केले होते. धोत्रे यांनी अशा आशयाचे विधान 2014 साली केले होते.

‘डेक्कन क्रोनिकल्स’च्या वेबसाईटवर 29 डिसेंबर 2014 रोजी प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, संजय धोत्रे यांनी एका कार्यक्रमात ‘शेतकऱ्यांना मरू द्या असे विधान केले होते.

मूळ बातमी – डेक्कन क्रोनिकल्सअर्काइव्ह

अधिक सर्च केले असता टाईम्स नाऊ वृत्तवाहिनीवरील बातमी सापडली. त्यात संजय धोत्रे यांच्या विधाना व्हिडिओ आहे. त्यात ते म्हणतात की, “एकीकडे हे सेंद्रीय शेतीच्या गोष्टी करतात तर दुसरीकडे बीटी तंत्रज्ञानावर आधारित शेतीचा पण पुरस्कार करतात. त्यामुळे शेतकरी नेमकं काय करावं या पेचात पडलाय. काही तरी एक सांगा ना...35 वर्षे झाली आम्ही सेंद्रीय शेतीबद्दल ऐकतोय. पण त्यातील बरोबर काय हे कोणीही सांगत नाही. आता आमचीच जर ही स्थिती आहे तर शेतकरी तरी काय करणार. मला तर कधीकधी हे वाटतं की, आपले जे धोरणं असतात त्यामुळं शेतकरी संकटात येऊ लागला आहे. मी तर कितीदा चिडून असं म्हटलं की, शेतकऱ्याकडे काही लक्ष देण्याची गरज नाही. मरु द्या त्यांला. ज्याला पटलं तो शेती करल, करणार नाही जे होईल ते होईल.’’

https://www.youtube.com/watch?v=6GyuMmntfS4

या विधानावरून वाद उफाळल्यानंतर धोत्रे यांनी स्पष्टीकरण दिले होते की, त्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. ते म्हणाले की, “भाषणामध्ये मी शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवरच भाष्य केले. मला केवळ हे म्हणायचे होते की, सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ होण्याऐवजी त्यांचे नुकसानच होते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कामात आपण ढवळाढवळ करण्यापेक्षा त्यांना त्यांचे काम करू दिले ते जास्त आनंदी राहतील. त्याअनुषंगाने मी ते विधान केले होते. त्यामध्ये शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशीलता नव्हती. पण लोकांनी व माध्यामांनी केवळ एक विधान उचलून विपर्यास केला. ज्यांनी माझे संपूर्ण भाषण ऐकले त्यांना माझ्या भाषणात काहीह गैर वाटले नाही.”

मूळ बातमी – एनडीटीव्ही

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, संजय धोत्रे यांचे हे वादग्रस्त विधान 2014 सालातील आहे. त्याचा सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाशी काही संबंध नाही. ते संदर्भाशिवाय फिरत असल्यामुळे चुकीची माहिती प्रसारित होत आहे. शेतकरी आंदोलनाविषयी आमचे इतर फॅक्ट चेक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Avatar

Title:‘शेतकऱ्यांना मरू द्या’ असे भाजप खासदार संजय धोत्रे का म्हटले होते? वाचा व्हायरल बातमीचे सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: Missing Context