
केंद्र सरकारने वक्फ कायदा सुधारणा विधेयक सादर केल्यावर इंडिया आघाडीकडून या विधेयकाचा विरोध करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर एक उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाने एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांचा फोटो आणि नावासह लिहिले आहे की, “केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नये.”
दावा केला जात आहे की, उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे.
पडातळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड फेक असून लोकमत द्वारे जारी करण्यात आलेले नाही. तसेच उद्धव ठाकरेंनी असे कोणतेही वक्तव्य केले नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल ग्राफिकमध्ये लोकमतचा लोगो दिसतो. उद्धव ठाकरेंचा फोटोसोबत लिहिले आहे की, “मी एकच सांगतो की, केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नयेत, वक्फ बोर्डवर बंधने आणू नयेत, वक्फ बोर्डच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत, मेहनतीने मिळवल्या आहेत, त्या मुसलमानांच्या च आहेत, मंदिरांसाठी वक्फ बोर्डचा बळी खपवून घेणार नाही. – उद्धव ठाकरे”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्व प्रथम उद्धव ठाकरेंनी असे खरंच वक्तव्य केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, ठाकरेंनी असे वक्तव्या कुठे, केव्हा आणि कधी केले ? या बद्दल कोणत्याही अधिकृत माध्यमावर आढळत नाही. तसेच उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरदेखील असे कोणतेही वक्तव्य केल्याची माहिती आढळत नाही.
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड फेक असून लोकमत द्वारे जारी करण्यात आलेले नाही.
लोकमतने 8 ऑगस्ट रोजी आपल्या अधिकृत वेबसाईटवर बातमी शेअर केली की, ‘लोकमत’च्या ग्राफिकशी मिळत-जुळत टेम्प्लेट तयार करून खोट्यादाव्यासह शेअर करण्यात आले होते. परंतु, व्हायरल होत असलेले हे ग्राफिक कार्ड फेक असून लोकमत द्वारे शेअर करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे संपर्कप्रमुख हर्षल प्रधान यांनीसुद्धा प्रसार माध्यमांना सांगितले की, “उद्धव ठाकरे यांनी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यांच्या नावाने खोटी बातमी पसरवली जात आहे.”
दिव्य मराठी
दिव्य मराठीने आपल्या बातमी पत्रात लिहितात की, “मी एकच सांगतो की केंद्राने वक्फ बोर्डवर बंधने आणू नयेत, वक्फ बोर्डच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या आहेत, मेहनतीने मिळवल्या आहेत, त्या मुसलमानांच्याच आहेत, मंदिरांसाठी वक्फ बोर्डचा बळी खपवून घेणार नाही, अशी उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली.”
परंतु, उद्धव ठाकरेंनी ही भूमिका कुठे माडली ? या बाबत कोणतीही अधिकृत महिती दिव्यमराठीच्या लेखात देण्यात आलेली नाही.
मूळ पोस्ट – दिव्य मराठी | आर्काइव्ह
उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी वक्फ कायदा सुधारणा विधेयक आणि सत्ताधाऱ्याचा विरोध केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, “सत्ताधाऱ्यांकडे बहुमत असताना वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडण्याचं नाटक तुम्ही का केले? शिवसेनेचे खासदार उपस्थित नव्हते, कारण मी स्वत: दिल्लीत होतो. सर्व खासदार माझ्यासोबत होते. विधेयकावर चर्चा करायचे ठरवले असते तर माझे खासदार विधेयकावर काय बोलायचे असते ते बोलले असते. वक्फ बोर्ड बाजूला ठेवा, माझ्या मंदिराची जमीन चोरली जात असेल आणि तिथे तुमचे मित्र येऊन बांधकाम करणार असतील तर वक्फ असो, हिंदू संस्थान असो वा कुठल्याही धर्माच्या जागा असतील आम्ही वेडवाकडे त्यावर काही होऊ देणार नाही.” अधिक महिती आपण येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट आहे. लोकमत द्वारे जारी करण्यात अलेले नाही. तसेच उद्धव ठाकरेंनी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. भ्रामक द्वाव्यासह ग्राफिक व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:उद्धव ठाकरेंनी न केलेले वक्तव्य लोकमतचे लोगो वापरू फेक ग्राफिक कार्ड व्हायरल; वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Altered
