
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त भारत सरकारने स्मारक नाणी आणि तिकिटे जारी केली. याच पार्श्वभूमीवर एका टपाल तिकिटाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “नेदरलँड्स सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त विशेष टपाल तिकिट जारी केले आहे.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी ही पोस्ट आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल पोस्टसोबत केलेला दावा भ्रामक आहे. नेदरलँड्स सरकारने असे कोणतेही विशेष टपाल जारी केलेले नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये ‘हिंदू स्वयंसेवक संघ नेदरलँड’चा लोगो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त तयार केलेले विशेष टपाल दिसते.
युजर्स ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “नेदरलँड सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष स्मरण टपाल तिकिट प्रकाशित केले आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम नेदरलँड्स सरकारने असा कोणताही निर्णय घेतला असता तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, नेदरलँड्स सरकारने आरएसएसच्या शताब्दी निमित्त विशेष टपाल तिकिट जारी केल्याची बातमी कोणत्याही माध्यमांवर आढळत नाही.
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर ऑर्गनायझर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्राच्या वेबसाईटवर हे टपाल तिकीट 10 ऑक्टोबर रोजी शेअर केल्याचे आढळले.
सोबत दिलेल्या महितीनुसार नेदरलँड्समधील हिंदू स्वयंसेवक संघ (HSS NL) नावाच्या संघटनेने 9 ऑक्टोबर रोजी, जागतिक टपाल दिनानिमित्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाचे स्मरण करण्यासाठी हे टपाल जारी केले होते.

मूळ पोस्ट – ऑर्गनायझर | आर्काइव्ह
नेदरलँड्स टपाल तिकीट
नेदरलँड्स टपाल विभागाच्या वेबसाइटद्वारे कोणीही त्यांच्या पसंतीच्या फोटोसह टपाल तिकीट तयार करू शकतो. हे करण्यासाठी त्यांना फक्त इच्छित फोटो आणि निश्चित शुल्क भरावे लागते.
खालील तुलनात्क फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, नेदरलँड्स टपाल विभागाच्या वेबसाइटद्वारे कोणही आपल्या इच्छेनुसार टपाल तिकीट तयार करू शकतो.

निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल पोस्टसोबत केलेला दावा खोटा आहे. हे टपाल तिकीट नेदरलँड्स सरकारने नाही तर हिंदू स्वयंसेवक संघ नावाच्या संघटनेने प्रकाशित केले होते. तसेच नेदरलँड्सच्या पोस्टल डिपार्टमेंट वेबसाइटद्वारे कोणीही त्यांच्या निवडीच्या प्रतिमांसह टपाल तिकीट तयार करू शकतो. भ्रामक दाव्यासह ही पोस्ट शेअर केली जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:नेदरलँड्स सरकारने RSS शताब्दी निमित्त विशेष टपाल जारी केले नाही; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading


