पंजाबमध्ये चिमुरडा आईचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढतानाचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

False Social

पंजाबमध्ये सध्या महापुरामुळे नैसर्गिक संकट कोसळलेले आहे. याच पार्श्वभूमीवर एका लहान मुलाद्वारे महिलेचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, “ हा व्हिडिओ पंजाबचा आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ स्क्रिप्टेड असून बिहारमध्ये एका ब्लॉगरने तयार केला होता.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा एका महिलेचा मृतदेह पाण्यातून घेऊन जाताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पंजाब येथील पुरस्थितीतील हे चित्रण असून काठावरील लोक मदत कामाव्यतिरिक्त व्हिडिओ करण्यात व्यस्त होते यासारखे दुर्दैव नाही.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ पंजाबचा नाही.

बिहारमधील जिल्हा कोचधामन क्षेत्रातील एमआयएम ट्विटर पेजवर हा व्हिडिओ शेअर करत हे पंजाबचे दृष्य असल्याचा दावा केला.

या ट्विटवर प्रतिउत्तर देत यूपी प्रभात लाईव न्यूजने एका अन्य ट्विटर युजरने अपलोड केलेल्या ह्याच व्हिडिओचा स्क्रिनशॉट शेअर केला. ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये महिती दिली की, “या व्हिडिओमधील महिलेचे नाव आरती गंगवार असून ती उत्तर प्रदेशातील पिलीभीत शहराची निवासी आहे.”

आर्काइव्ह

हा धागा पकडत अधिक सर्च केल्यावर आरती गंगवार एक ब्लॉगर असल्याचे आढळले. आरती गंगवारने आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवर व्हायरल व्हिडिओशी मिळतेजुळते क्लिप्स शेअर केले आहेत.

परंतु, व्हायरल व्हिडिओ मूळ पेजवरुन हटवण्यात आला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक

आरती गंगवारचे स्पष्टीकरण

चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरती गंगवार यांनी इंस्टाग्रामवर क्लिप शेअर करत सांगितले की, “मी काही दिवसांपूर्वी शेअर केलेला एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माझ्या मृत्यूची अफवा पसरली होती. परंतु, मी सुखरुप असून हा व्हिडिओ बनवताना मी माझ्या परिवारासोबत होते. तो व्हिडिओ कोणाची दिशाभूल करण्याच्या हेतुने नाही तर केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवण्यात आला होता.”

आर्काइव्ह

तसेच पंजाब पूरस्थितीशी जोडून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरती गंगवार यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत “हा दावा खोटा असून कृपया अफवा पसरवू नका,” असे सांगितले.  

आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ पंजाब पूरशी संबंधित नाही. मुळात हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असून स्वाती गंगवार नामक ब्लॉगरने तयार केला होता. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पंजाबमध्ये चिमुरडा आईचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढतानाचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *