
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राहुल गांधी यांच्यावर भाजपाचे खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन पाडल्याचा आरोप केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी माध्यामांशी बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, “राहुल गांधींनी भाजप नेते प्रताप सारंगींना धक्काबुक्की केल्याचे मान्य केले.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळात राहुल गांधी भाजप नेते प्रताप सारंगींना झालेल्या धक्काबुक्की बद्दल बोलत नव्हते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये राहुल गांधी माध्यमांसोबत धक्काबुक्की बद्दल बोलताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “राहुल गांधी स्वतः म्हणतात की, “होय, मी भाजपचे दलित खासदार प्रताप सारंगी यांना धक्का दिला, तर काय झाल? त्यांचे डोकं फुटलं, तर काय झाल?”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
भाजप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीदेखील याच दाव्यासह व्हायरल व्हिडिओ शेअर केला.
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ अर्धवट आहे.
एएनआयने 19 डिसेंबर रोजी मूळ व्हिडिओ आपल्या फेसबुक आणि ट्विटर पेजवर शेअर केला होता.
व्हिडिओमध्ये सुरुवातीला पत्रकार राहुल गांधींना प्रश्न विचारतात की, भाजप खासदार आरोप करत आहेत की, आपण धक्का दिला !
त्यावर राहुल गांधी ‘नाही’ असे उत्तर देत पुढे म्हणतात की, “मी संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो. तेव्हा भाजप खासदारांनी मला रोखले, धक्काबुक्की केली आणि मला धमक्या देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हा प्रकार घडला.”
पुढे पत्रकार विचारतात की, मल्लिकार्जुन खरगे यांच्या सोबतदेखील धक्काबुक्की झाली आहे का?
याप्रश्नावर राहुल गांधी “होय असे झाले आहे,” असे होकारार्थी उत्तर देतात आणि म्हणतात की, “धक्के मारण्याने आम्हाला फरक पडत नाही. पण हे संसदचे प्रवेशद्वार असून आम्हाला आत जाण्याचा अधिकार आहे. परंतु, भाजपचे खासदार आम्हाला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते.”
राहुल गांधींचे हेच विधान आपण प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आणि इंडो-एशियन न्यूज सर्व्हिसच्या ट्विटर पेजवर पाहू शकता.
संपूर्ण प्रकरण काय ?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 17 डिसेंबर रोजी राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर कथित वादात्मक टिप्पणी केली होती.
काँग्रेसने या वक्तव्याचा विरोध दर्शवित अमित शाह यांनी माफी मागत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 19 डिसेंबर रोजी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याशेजारी काँग्रेस व इतर विरोधक खासदारांनी शहांविरोधात निदर्शने केली. त्यानंतर हे सर्व खासदार घोषणाबाजी करत मकरद्वारासमोर आले. त्यावेळी तिथे भाजपचे खासदार आधीच काँग्रेसविरोधात निदर्शने करत होते. दोन्ही बाजूंचे सदस्य आंबेडकरांचे छायाचित्र घेऊनच घोषणाबाजी करत होते. यावेळी दोन्हीकडील खासदार एकमेकांना भिडले. या गोंधळात राहुल गांधींनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे खासदार प्रताप सारंगी यांनी केला.
काँग्रेस पत्रकार परिषद
खालील पत्रकार परिषदमध्ये मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की, “आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. पण त्यांनी आम्हाला मकरद्वारासमोर रोखले. त्यांची मसल पॉवर दाखवण्यासाठी त्यांनी ते (भाजप) अनेक पुरुष खासदार घेऊन आले होते. आमच्याबरोबर महिला खासदार होत्या, त्यांनाही थांबवण्यात आलं होते.”
पुढे खरगे भाजपा खासदारांनी काँग्रेस नेत्यांना ढकलल्याचा आरोप करत म्हणाले की, “मी कोणालाही धक्का देण्याच्या स्थितीत नाही. मला माझा तोल सांभाळता आला नाही आणि मी खाली बसलो. परंतु, आता ते (भाजप) आरोप करत आहेत की आम्ही त्यांना धक्का दिला”.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये राहुल गांधी त्यांना संसदेच्या प्रवेशत भाजप खासदार रोखण्याचा प्रयत्न आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झाल्या धक्काबुक्की बद्दल सांगत होते.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:राहुल गांधींनी भाजप नेते प्रताप सारंगींना धक्काबुक्की केल्याचे मान्य केले नाही; अर्धवट क्लिप व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Altered
