
मुंबईमध्ये अलिकडेच सुरु असलेल्या भाषा वादात अ-मराठी भाषिकांवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका चर्चेचा विषय ठरला आहे.
याच पार्श्वभूमीवर एका व्यक्तीद्वारे वृद्ध महिलेला धक्काबुक्की आणि मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्याची घटना म्हणून शेअर केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना 2022 मध्ये घडली होती.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वृद्ध महिलेला धक्काबुक्की, मारहाण आणि शिविगाळ करताना दिसते.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “मनसे कार्यकर्ते ची दादागिरी बॅनर लावण्या वरून विरोध करत असणाऱ्या वृध्द महिलास मनसे कार्यकर्ते करून मारहाण.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील घटना 2 वर्षांपूर्वीची आहे.
एबीपी माझाने 2 सप्टेंबर 2022 रोजी हाच व्हिडिओ आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर शेअर केला होता.
एबीपी माझाच्या बातमीनुसार ही घटना मुंबईमधील नागपाडा भागात घडली होती. पिडित महिलेचे नाव प्रकाश देवी असून गणेश उत्सवामध्ये त्यांच्या दुकानासमोर बॅनर लावण्याच्या वादवरुन ही मारहाण झाली होती. पीडित महिलेले मारहाण करणाऱ्या कामाठीपुरा विभागातील मनसे उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांच्या विरोधात करवाई करण्याची मागणी केली.
तसेच विनोद अरगिळे यांनी पिडित महिला प्रकाश देवींवर अरोप केले की, “ही बाई कोट्याधीश असून रोडवर हप्ता खाते. ही रोज रोडवर धंदे लावते. तिला विभागातील सर्वच नागरीक त्रासले आहेत. आम्ही गणेशभक्तांच्या स्वागतासाठी गेट लावत होतो तेव्हा या बाईने 20 फुटांचा वासा ढकलून दिला. तो लाकडी वासा कुणाच्या अंगावर पडला असता तर अनेकजण जखमी झाले असते. हे राज ठाकरेच्या घरी लावा असं ही बाई म्हणाली. तसेच माझ्या अंगावर आली.” अधिक महिती येथे वाचू शकता.
मनसेची कारवाई
या प्रकारावरून पक्षाला लक्ष्य केले जात असताना अरगिळेंवर कारवाई केल्याची माहिती मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली.
मनसेचे नेते आणि प्रवक्ते बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या वतीने जारी केलेल्या पत्रात म्हटले की, “1 सप्टेंबर 2022 रोजी कामाठीपुरा या परिसरात घडलेली घटना पाहून मन विषण्ण झाले. पक्षाध्यक्ष राज ठाकरेंनी महिलांचा सदैव आदर केला आहे. तशाच प्रकारचा आदेश कार्यकर्त्यांना दिला असूनही ही घटना घडली याबाबत मी पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करत आहे. याबाबत पक्षानं कठोर भूमिका घेतली असून त्याचाच एक भाग म्हणून कामाठीपुरा विभागातील उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिले यांना पदमुक्त करण्यात येत आहे.” अधिक महिती येथे वाचू शकता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ सध्याचा नसून ही घटना 2 वर्षांपूर्वी घडली होती. घटनेनंतर मनसेने महिलेला मारहाण करणाऱ्या पदाधिकाऱ्या विरोधात कारवाई करत त्याला पदावरून काढून टाकले होते. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:मनसे पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचा जुना व्हिडिओ सध्याची घटना म्हणून व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Missing Context
