
आमदार भास्कर जाधव यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे यांची मिमिक्री केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, आमदार भास्कर जाधव ठाकरे गटाच्या शिवसेनेत असतांना त्यांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 11 वर्षांपूर्वीचा असून भास्कर जाधव तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये भास्कर जाधव आदित्य ठाकरेंवर व्यंगात्मक मिमिक्री करताना दिसतात.
व्हिडिओमध्ये लिहिलेले आहे की, “‘बाळासाहेबांचं वासरु’ आदित्य ठाकरेंची मिमिक्री, शिवसेना आमदार भास्कर जाधवांची टिका.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, आदित्य ठाकरे नक्कल करताना भास्कर जाधव.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
कीव्हड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 11 वर्षांपूर्वीचा आहे.
भास्कर जाधव 2013 मध्ये राष्ट्रवादी पक्षाचे नगर विकास राज्यमंत्री होते.
न्यूज 18 लोकमत चॅनलने 13 मे 2013 रोजी हा व्हिडिओ शेअर केला होता.
या व्हिडिओमध्ये भास्कर जाधव आदित्य ठाकरेंची मिमिक्री व शिवसेनेच्या विरोधात बोलताना दिसतात. तसेच शेवटी ते राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिबा देण्याचे जनतेला आवाहन करतात.
तेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भास्कर जाधव यांच्या टिकेला उत्तर देताना तत्कालिन शिवसेना गटाच्या प्रवकत्या निलम गोरे (सध्या शिंदे गटातील नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती) म्हणतात की, “भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरेंवर केलेले वैयक्तिक विधान राष्ट्रवादी पक्षाची मर्जी राखण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न आहे.”
भास्कर जाधव ठाकरे गट प्रवेश
राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी 13 सप्टेंबर 2019 रोजी विधासभासद्याचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला होता.
खालील बातमीच्या स्क्रिनशॉर्टमध्ये उद्धव ठाकरे हे भास्कर जाधव यांना शिवबंधन बांधून पक्षप्रवेश देताना दिसतात. संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.

अर्थात व्हायरल व्हिडिओ 10 वर्षांपूर्वीचा आहे. भास्कर जाधव जेव्हा राष्ट्रवादी पक्षात विरोधी नेत्याच्या भूमिकेत होते, तेव्हा त्यांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली होती. ठाकरे गटात असताना नाही.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 11 वर्षांपूर्वीचा आहे. ठाकरे गटाचे नेते असताना भास्कर जाधव यांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केली नाही. राष्ट्रवादी पक्षात असताना 2013 रोजी त्यांनी हे वक्तव्य केले होते. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:भास्कर जाधवांनी आदित्य ठाकरेंची मिमिक्री केल्याचा व्हिडिओ 11 वर्षांपूर्वीचा; सध्याचा म्हणून व्हायरल
Written By: Sagar RawateResult: Misleading
