उद्य सामंत यांच्या नावाने लोकसत्ताचे बनावट ग्राफिक व्हायरल

Altered राजकीय | Political

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीदेखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार उद्य सामंत यांच्या नावाने लोकसत्ताचे एक ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, “भविष्यात पक्ष व चिन्ह जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणन्यानुसार उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल आहे, असे उद्य सामंत म्हणाले.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल ग्राफिक कार्ड बनावट असून लोकसत्ताद्वारे जारी करण्यात आले नाही. तसेच उद्य सामंत यांनी असे कोणतेही वक्तव्य केले नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल ग्राफिकमध्ये लोकसत्ताचा लोगो आणि आमदार उद्य सामंत यांचा फोटो दिसतो.

सोबत ग्राफिकमध्ये लिहिले होते की,  “मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन व संघटन वाढवेन असे एकनाथ शिंदे आम्हाला म्हणाले होते. पण देवेंद्रजी म्हणाले की भविष्यात तुमचा पक्ष व चिन्ह जाणार आहे. मग काय डोमल्याचे संघटन वाढवणार काय ? मग त्यानंतर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार झाले. – उद्य सामंत, आमदार, शिवसेना (एकनाथ शिंदे).”

युजर्स हे ग्राफिक शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “शिंदे गटवाल्यानो, उघडा डोळे वाचा नीट. स्वतःचा स्वाभिमान विकलेल्या गद्दारांची अवस्था एक दिवस अशीच होते.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर लोकसत्ताच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हायरल ग्राफिक आढळले नाही.

या उलट लोकसत्ताच्या फेसबुक पेजवर खालील प्रमाणे ग्राफिक कार्ड आढळले. या पोस्टमधील फोटो आणि लोगो एक सारखे आहे, परंतु, विधान वेगळे आहे.

या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “मी पक्षप्रमुख म्हणून काम करेन आणि संघटना वाढवेन असं एकनाथ शिदे आम्हाला म्हणाले होते. मात्र आम्हा सगळ्या आमदारांची इच्छा आहे की त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावं. एकनाथ शिंदे यांनी प्रशासनात जावं अशी आमची इच्छा आहे.”

उद्य सामंतांचे खंडण

व्हायरल ग्राफिकची दखल घेत आमदार उद्य सामंत ट्विट करत त्यांनी असे वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले.

तसेच उद्य सामंत यांनी पत्रकार परिषदमध्ये व्हायरल ग्राफिक दाखवत स्पष्ट केले की, त्यांनी असे वक्तव्य केले नसून लोकसत्ताचे लोगो आणि ग्राफिक वापरुन फेक बातमी पसरवली जात आहे. या विरोधत कायदेशीर कारवाही केली जाईल.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक फेक असून लोकसत्ताद्वारे जारी केलेले नाही. आमदार उद्य सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन असे कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे स्पष्ट केले.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:उद्य सामंत यांच्या नावाने लोकसत्ताचे बनावट ग्राफिक व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Altered