
सध्या सोशल मीडियावर मोहम्मद रफी यांनी गायलेल्या “जन्नत की है तस्वीर ये तस्वीर न देंगे” हे गाणे व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, या गाण्यावर बंदी घाण्यासाठी पाकिस्तान सरकारने तत्कालीन काँग्रेस सरकारवर दबाव आणला होता आणि त्यानुसार बंदीसुद्धा घातली गेली होती.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा असून या गाण्यावर बंदी घतली गेली नव्हती.
काय आहे दावा ?
“जन्नत की है तस्वीर ये तस्वीर न देंगे” गाण्याच्या व्हिडिओसोबत युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “मोहम्मद रफी साहेबांनी गायलेल्या या गाण्यामुळे पाकिस्तानात अस्वस्थता पसरली. या गाण्यावर बंदी घालण्यासाठी पाकिस्तान सरकारने तत्कालीन भारत सरकारवर दबाव आणला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस सरकारने या गाण्यावर बंदी घातली!”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम किव्हर्ड सर्च केल्यावर मोहम्मद रफी यांच्या युट्यूब चॅनलवर हे गाणं 5 ऑगस्ट 2019 रोजी शेअर केल्याचे आढळले.
या पूर्वीदेखील अनेक युट्यूब चॅनलने हे गाणं शेअर केले आहे.
पुढे शोध घेतल्यावर कळाले की, हे गाणं 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जौहर इन काश्मीर‘ चित्रपटातील आहे. या गाण्याचे बोल इंदिवर यांनी लिहिले असून मोहम्मद रफी यांनी ते संगितबद्ध केले आहे.
या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती का याविषयी शोध घेतल्यावर कोणतीही अधिकृत बातमी अथवा माहिती समोर आली नाही. म्हणून फॅक्ट क्रेसेंडोने मोहम्मद रफी यांचे चिरंजीव शाहिद रफी यांच्यासी संपर्क साधला. या गाण्याविषयी केला जाणारा दावा त्यांनी खोटा असल्याचे सांगितले.
“माझ्या वडिलांच्या कोणत्याच गाण्यावर कधीही बंदी घालण्यात आलेली नाही. शिवाय सदरील गाणे चित्रपटातदेखील आहे. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती, हा दावा निराधार आहे,” असे ते म्हणाले.
चित्रपट सेन्सॉर बोर्डाने या गाण्यावर आक्षेप घेतला होता हेदेखील तपासले. 17 डिसेंबर 1966 रोजी प्रकाशित झालेल्या गॅझेट रिपोर्टमध्ये सेन्सॉर बोर्डाने सुचविलेल्या बदलांची सूची दिलेली आहे. गॅझेटच्या पृष्ठ क्र. चारवर जोहर इन काश्मीर चित्रपटातील कट्सविषयी माहिती आहे.
त्यानुसार, सेन्सॉर बोर्डाने या गाण्यातून केवळ ‘हाजी पीर’ हे दोन शब्द वगळण्यास सांगितले होते. अंतिम गाण्यामध्ये हे शब्द नाहीत. गाणे डिलीट करण्याचा किंवा त्यावर बंदी घालण्याचा कुठलाही उल्लेख सेन्सॉर बोर्डाने केलेला नाही.
गॅझेटमधील पृष्ठ कृमांक चारचा स्क्रीनशॉट. स्रोत – गॅझेट (1966)
निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होते की, मोहम्मद रफी यांनी गायिलेल्या ‘कश्मीर ना देंगे’ या गाण्यावर भारत सरकारने बंदी घातली नव्हती. ते गाणे चित्रपटातून वगळण्यात आले नव्हते. या गाण्यासोबत केला जाणारा दावा खोट आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:काँग्रेसने मोहम्मद रफी यांच्या ‘काश्मीर’ वरील गाण्यावर बंदी घातली होती का ? वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
