मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतीय संविधानावर अविश्वास दाखवला का ? वाचा सत्य 

Altered राजकीय | Political

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, आमचा भारतीय संविधान आणि लोकशाहीवर विश्वास नाही.

दावा केला जात आहे की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संविधान आणि लोकशाहीवर अविश्वास दाखवला आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट असून देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य स्वत:च्या संदर्भात केले नव्हते.

काय आहे दावा ?

व्हायरल क्लिपमध्ये महाराष्ट्र विधानसभेचे लोगो दिसतो. यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात की, “भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही. भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही. भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही. म्हणून आम्हाला पॅरलल (समांतर) राज्य तयार करायचे आहे.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “धक्कादायक ! सजग नागरिक म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ पहावा.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल क्लिप विधानसभेमधील हिवाळी अधिवेशनदरम्यान राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणातील एका भागाची आहे.

महाराष्ट्र विधानसभेच्या अधिकृत युट्यूब चॅनलने 19 डिसेंबर रोजी या हिवाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण केले होते.

वरील व्हिडिओ पाहिल्यावर कळाले की, देवेंद्र फडणवीस यांनी व्हायरल क्लिपमध्ये केलेल वक्तव्य नक्षलवाद्यांच्या संदर्भात केले होते.

व्हायरल क्लिपमधील वक्तव्य करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस 5 तास 39 मिनिटावर म्हणतात की, “देशाच्या निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेप सुरू झाला असल्याचे पुरावे संसदेत आले आहेत. आपल्यामध्ये वैचारिक मतभेद असून तुमच्या (विरोधी पक्ष) देशभक्तीवर शंका नाही. परंतु, आपले विरोधक स्वत:चा खांदा कोणाला तरी बंदूक ठेवायला देत आहे, याचं मला दु:ख आहे. आपल्या खांद्यावर कोण बंदूक ठेवत आहे ? कधी तरी याचा विचार केला पाहिजे.”

पुढे, फडणवीस म्हणतात की, “मी जेव्हा भारत जोडो आंदोलनावर बोललो तेव्हा काही लोकांनी माझ्यावर टीका केली होती. आज पुराव्यासहित बोलणार आहे. भारत जोडो हे आंदोलन नसून अभियान आहे. या अभियानाची सुरु सन्माननीय राहुल गांधींनी केली. या ठिकाणी मी बोललो होतो की, या अभियानात कोण सहभागी होत आहे जरा बघा. या देशात आपण नक्षलवादाच्या विरोधात लढाई पुकारली आहे. हे नक्षलवादी काय करतात ? “नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही. भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही. भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही; म्हणून आम्हाला पॅरलल (समांतर) राज्य तयार करायचे आहे.” जेव्हा देशात नक्षलवादी विरुद्ध मोठी लढाई सुरू झाली आणि त्यांची संख्या कमी होऊ लागली; तेव्हा हा नक्षलवाद शहरामध्ये सुरक्षित जागा शोधायला लागला. पुढे हेच अराजकतेचे विचार आमच्या मुलांच्या मनात पेरण्यासाठी फ्रंटल ऑर्गेनाइजेशन उभारल्या गेल्या.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेच भाषण आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केले आहे.

बीबीसीने देखील आपल्या बातमीत देवेंद्र फडणवीस यांचे सदरील भाषणातील हेच वक्तव्य शेअर केले आहे. संपूर्ण बातमी येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘भारताच्या संविधान आणि लोकशाहीवर आमचा विश्वास नाही’ हे वक्तव्य नक्षलवाद्यांच्या संदर्भात केले होते.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतीय संविधानावर अविश्वास दाखवला का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: Altered