
बांगलादेशमधील मुस्लिम जमावाने हिंदूंना मारहाण करत त्यांचे शेत आणि राहते घर उध्वस्त केले, या दाव्यासह एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ हिंदूंवरील अत्याचाराचा नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये मुस्लिम जमाव हातात लाठ्या-काठ्या घेऊन झाडांची नासधूस करताना, गाई-म्हशी घेऊन जाताना आणि पत्र्याचे शेड तोडताना दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितो की, “पूर्व बंगाल मधील (बांगलादेश) अल्पसंख्यांक हिंदूंना,गावा-गावात हेरून मारलं असताना, त्यांची उभी पिक उध्वस्त केली.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा नाही.
जय बांगला नामक फेसबुक पेजने 29 नोव्हेंबर रोजी हाच व्हिडिओ शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “अल्पसंख्याक समुदाय असल्याने मुस्लिम कट्टरतावादी अतिरेक्यांपासून सुरक्षित नाहीत. शेरपूर मुर्शिदपूर दरबार शरीफ येथे झालेल्या हल्ल्याची आणि लुटमारीची व्हिडिओ क्लिप पाहता बांगलादेश आज कुठे चालला आहे, हे स्पष्ट होते. या दहशतवाद्यांना आश्रय देऊन बेकायदेशीर युनूस सरकार बांगलादेशला एक दहशतवादी राष्ट्र बनवू इच्छित आहे, असे म्हणता येत नाही.”
परंतु, या पोस्टमध्ये कुठे ही ‘मुस्लिम जमावाद्वारे हिंदूवर हल्ला झाल्याचे’ म्हटले नाही.
अधिक सर्च केल्यावर बांगला अफेअर्स यूट्यूब चॅनलने 28 नोव्हेंबर रोजी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 50 सेकंदांपासून व्हायरल क्लिप पाहू शकतो.
व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, “बांगलादेशातील शेरपूर परिसरात काही मुस्लिम लोकांनी पीर मजार नावाच्या दर्ग्यावर हल्ला करुन लुटले.”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर रोजी मुर्शिदपूरच्या ग्रामस्थांनी कौमी मदरशातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी दरबार शरीफमधील अनैतिक कृत्यांची तक्रार करुन तो बंद करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पीरच्या अनुयायांशी ग्रामस्थांची हाणामारी झाली.
ढाका ट्रिब्यूनच्या बातमीनुसार, शेरपूरच्या लक्ष्मणपूर भागात डोजा पीर यांच्या नेतृत्वाखालील मुर्शिदपूर दरबार शरीफची तोडफोड आणि लुटमारीच्या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले होते. चारशे ते पाचशे अज्ञात लोकांनी केलेल्या हल्ल्यात 13 जण जखमी झाले असून या पैकी आठ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरबार शरीफचे केअरटेकर महमूदन मसूद यांनी स्थानिक मदरशाच्या अधीक्षकासह २५ संशयितांची तक्रार दाखल केली आहे. मदरसा शिक्षक आणि स्थानिक रहिवाशांनी दरबार शरीफवर इस्लामविरोधी कारवायांमध्ये गुंतल्याचा आरोप करून हल्ल्याला चिथावणी दिली, असा त्यांचा दावा आहे. अधिकारी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ हिंदूंवरील अत्याचार नसून बांगलादेशातील दोन मुस्लिम गटातील संघर्षाचा आहे. सांप्रदायिक रंग देऊन हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:बांगलादेशातील मुस्लिम गटातील आपसातील संघर्षाचा व्हिडिओ हिंदूंवरील अत्याचार म्हणून व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: False
