
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उठून जाताना आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी खरगेंची खुर्ची ओढताना दिसतात.
दावा केला जात आहे की, राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खरगेंना त्यांच्या जागेवरुन उठवून त्यांना अपमानीत केले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आले. मुळात राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगेंची मदत करत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे उठून जातात आणि राहुल गांधी त्यांची खुर्चीला हात लावताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “एवढ्या मोठ्या वयाच्या व्यक्तीला खुर्चीवरून उठवले युवराजांनी !”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ काँग्रेसच्या नवीन मुख्यालयच्या उद्घाटनादरम्यानचा आहे.
काँग्रेसच्या अधिकृत युट्यूब चॅनलने 15 जानेवारी रोजी या उद्घाटनाचा व्हिडिओ शेअर केला होता.
कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “दिल्ली येथील नवीन एआयसीसी मुख्यालय असलेल्या इंदिरा भवनचे उद्घाटन.”
वरील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळाले की, या ठिकाणी कुठेही राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खरगेंचा अपमान केलेला नाही.
या व्हिडिओमध्ये 28 मिनिटांनी राज्यसभा खासदार आणि काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष अजय माकन यांनी राहुल गांधींना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते, तर राहुल गांधी त्यांचे भाषण 46:06 मिनिटावर संपवले होते.
त्यानंतर माकन मल्लिकार्जुन खरगे यांना भाषण करण्यासाठी आमंत्रित करतात. या ठिकाणी 46:45 मिनिटावर आपल्याला व्हायरल क्लिप दिसते, ज्यामध्ये राहुल गांधी खरगेंना त्यांच्या खुर्चीवरुन भाषणासाठी उठण्यास मदत करताना दिसतात.
प्रियंका गांधी वाड्रा यांच्या युट्यूब चॅनलवर याच कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.
खालील व्हिडिओमध्ये 45:43 मिनिटावर आपण व्हायरल क्लिप पाहू शकता.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे भाषणासाठी माईक कडे जात असताना राहुल गांधी त्यांना खुर्चीतून उठण्यास मदत करत होते. खोट्या दाव्यासह अर्धवट व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:Edited Video: राहुल गांधींनी मल्लिकार्जुन खरगेंना त्यांच्या जागेवरुन उठवून अपमानीत केले नाही
Fact Check By: Sagar RawateResult: Altered
