जपनामध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने रौप्यपदक जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू आणि नागिरक दोघांचा उत्साह वाढलेला आहे.

या पार्श्वभूमीवरच कुस्तीपटू प्रिया मलिकने सुवर्णपदक पटकावल्याची बातमी आली. सोशल मीडियावर अनेकांना वाटले की, प्रिया मलिकने टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेतच भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अशा आशयाच्या पोस्टही शेअर करण्यात आल्या.

परंतु, फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत या पोस्ट असत्य आढळल्या.

काय आहे दावा?

प्रिया मलिकने ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड पटकावल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या. उस्मानाबादचे खासदार आणि शिवसेना नेते ओम राजेनिंबाळकर यांनी फेसबुक पोस्टद्वारे तिला शुभेच्छा देत टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे हॅशटॅग वापरले.

मूळ पोस्ट – फेसबुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर आमदार अरुण लाड यांनीसुद्धा टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे हॅशटॅग वापरून तिला शुभेच्छा दिल्या.

मूळ पोस्ट – फेसबुक

इतरांनी लिहिले की, “भारताला टोकियो ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक प्रिया मलिकने कुस्ती मध्ये केली कामगिरी”

तथ्य पडताळणी

प्रिया मलिकने सुवर्णपदक पटकावले हे खरं आहे; परंतु, ही कामगिरी तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये केलेली नाही.

हंगेरी येथे नुकतीच जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत प्रिया मलिकने 75 किलो वजनी गटात बेलारुसच्या कुस्तीपटूचा 5-0 असा पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले.

भारत सरकारच्या MyGovIndia ट्विटर अकाउंटवरून तसे ट्विटदेखील करण्यात आले.

https://twitter.com/mygovindia/status/1419190285452550147

हंगेरीच्या बुडापेस्ट शहरामध्ये 19 ते 25 जुलैदरम्यान जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत युवा कुस्तीपटू तनु हिनेसुद्धा 43 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

अंतिम सामन्यात तनुने बेलारुसच्या वालेरिया मिकिसिचचा पराभव केला होता. तर प्रियाने बेलारुसच्याच सेनिया पटापोविचला पराभूत केले. 65 किलो वजनी गटात वर्षाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

हे फॅक्ट चेक प्रकाशित झाले तेव्हा भारताच्या नावे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत केवळ एकच पदक असून, पदतालिकेत भारताचा 42 वा क्रमांक आहे. आतापर्यंत 12 गोल्ड मेडलसह जपान पहिल्या क्रमांकावर असून, त्यानंतर चीन (11 गोल्ड) आणि अमेरिका (10 गोल्ड) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, प्रिया मलिक हिने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेले नाही. तिने जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत पदक जिंकले आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:प्रिया मलिकने टोकियो ऑलम्पिकमध्ये गोल्ड मेडल पटकावलेले नाही; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar

Result: False