
सोशल मीडियावर सोन्याच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी मस्त ठेका धरल्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, सोन्याचा भाव चाळीस हजारांच्या पुढे गेल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे रिकामे बसलेल्या या कर्मचाऱ्यांनी डान्स करून वेळ घालवला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
लोकसत्ता या दैनिकानेसुद्धा या व्हायरल व्हिडियोवरून 5 सप्टेंबर रोजी बातमी दिली की, सोन्याच्या दरामध्ये मागील काही आठवड्यांपासून सातत्याने वाढ होत आहे. यामुळे ग्राहकांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळेच ज्वेलर्सच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी वेळ घालवण्यासाठी दुकानामध्येच डान्स केला.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
काय आहे व्हिडियोत?
दोन मिनिटांच्या या व्हायरल व्हिडियोमध्ये दावा सोन्याच्या दुकानातील कर्मचारी एका गाण्यावर नाचत आहेत. लोकसत्ताच्या बातमीत म्हटले की, सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांची संख्या खूपच कमी झाली आहे. त्यामुळेच ज्वेलर्सच्या दुकानातील कर्मचाऱ्यांनी कंटाळा येऊ नये म्हणून चक्क दुकानामध्येच गाणी लावून डान्स केला आहे. या व्हिडिओमध्ये ज्वेलर्सच्या भव्य शोरुममध्ये एकही ग्राहक दिसत नाही. या संधीचा फायदा घेऊन नुसतं दुकानात बसून कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांनी वेळ घालवण्यासाठी मोठ्याने गाणी लावून नाचण्यास सुरुवात केली.
लोकसत्ताच्या बातमी खालील व्हिडियो दिला आहे.
सविस्तार बातमी येथे वाचा – लोकसत्ता । अर्काइव्ह
फेसबुकवर इतर पेजनेसुद्धा हा व्हिडियो याच दाव्यासह पोस्ट केला आहे – महाराष्ट्रनामा न्यूज । फुल टाईमपास लईभारी मराठी अड्डा
तथ्य पडताळणी
सदरील व्हिडियोला स्लो-मोशनमध्ये फ्रेम बाय फ्रेम निरीक्षण केल्यावर कळते की, या दुकानाचे नाव “Mano… Jewellers” असे काही तरी असले पाहिजे. मागच्या भिंतीवर हे नाव दिसते. व्हिडियोची क्वालिटी चांगली नसल्याने अत्यंत धुसर अक्षरे दिसतात. गुगलवर विविध शब्दांचा अंदाज बांधून सर्च केले असता मनोहरलाल ज्वेलर्स या दुकानाची माहिती मिळाली. दिल्लीस्थित मनोहरलाल ज्वेलर्सची डिफेन्स कॉलनी, प्रीत विहार, पितमपुरा, इंदिरापुरम, नोएडा आणि फरीदाबाद येथे सहा दुकाने आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोने मनोहरलाल ज्वेलर्सशी संपर्क केला असता तेथील प्रदीप शुक्ला यांनी सांगितले की, हा व्हिडियो मनोहरलाल ज्वेलर्सच्या प्रीत विहार दुकानातील असून, ग्राहक नसल्यामुळे कर्मचारी नाचत असल्याचा दावा खोटा आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडियो यावर्षीचा नसून दोन वर्षांपूर्वीचा आहे. मनोहरलाल ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये कर्मचारी सकारात्मक ऊर्जेने काम करावे म्हणून सकाळी हा उपक्रम घेण्यात येत असे. कर्मचारी थोड्यावेळा करीत नाचून प्रसन्न मनाने कामाल सुरूवात करीत. याच उपक्रमाचा हा व्हिडियो आहे. त्याचा सध्या वाढत असलेल्या सोन्याच्या दराशी काही संबंध नाही.
फॅक्ट क्रेसेंडोच्या हिंदी व गुजराती टीमने फॅक्ट चेक केले तेव्हा युट्यूबवर सुरेंद्र सिंग नामक युजरने अपलोड गेल्यावर्षी केलेला हाच व्हिडियो उपलब्ध होता. सुरेंद्र याच ज्वेलर्सचा कर्मचारी आहे. यामध्ये स्पष्ट म्हटले होते की, मनोहरलाल ज्वेलर्सच्या दुकानात मॉर्निंग रुटीनचा हा व्हिडियो आहे. परंतु, आता हा व्हिडियो काढण्यात आला. मनोहरलाल ज्वेलर्सनेसुद्धा हा व्हिडियो काढण्यात आल्याचे सांगितले. टाईम्स ऑफ इंडियानेसुद्धा हा व्हिडियो जूना आणि दुकानातील मॉर्निंग रुटीनचा असल्याचे म्हटले आहे.

निष्कर्ष
फॅक्ट क्रसेंडोने दिल्लीच्या मनोहरलाल ज्वेलर्सशी संपर्क साधून माहिती मिळवली की, व्हायरल होणार व्हिडियो दोन वर्षांपूर्वीचा आहे. दुकानातील मॉर्निंग रुटीनचा एक भाग म्हणून दुकानातील कर्मचारी नाचत आहेत. त्याचा सध्या सोन्याच्या वाढलेल्या दराशी काही संबंध नाही. त्यामुळे ग्राहक नसल्यामुळे कर्मचारी कंटाळ घालवण्यासाठी नाचत असल्याचा दावा चुकीचा आहे.

Title:सोन्याचा भाव वाढल्याने दुकानात ग्राहक नाहीत म्हणून हे कर्मचारी नाचत आहेत का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
