
हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकारणानंतर अशा गुन्हेगारांना कठोर आणि त्वरीत शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर या गुन्हेगारांना सार्वजनिक ठिकाणी शिक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली आहे. याच पार्श्वभूमिवर सौदी अरेबियात एका बलात्काऱ्यास केवळ 15 मिनिटांत गोळी मारण्याची शिक्षा देण्यात आल्याचा कथित व्हिडियो शेयर करून भारतातही अशाप्रकारे दंड दिला पाहिजे असे म्हटले जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्य?
एका व्यक्तीला रस्त्यावर गोळी मारून त्याला क्रेनद्वारे लटकविल्याचे या व्हिडियोमध्ये दिसते. सोबत लिहिले की, सौदी अरेबियामध्ये 5 वर्ष वयाच्या मुलीवर बलात्कार झाल्यानंतर 15 मीनीटात आरोपी पकडुन आरोपीला जाहीर रित्या भर चौकात गोळी मारून त्यास अशी कठोर शिक्षा देण्यात आली. भारत देशात ही अशा शिक्षेची तरतुद झाल्यास असे गुन्हेच घडणार नाहीत या बाबत संशोधन होण्याची नितांत आवश्यकता आहे.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसुबक । फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम गुगलवर “Man shot for Raping Child” असे सर्च केल्यावर न्यूयॉर्क पोस्टने 14 ऑगस्ट 2017 रोजी दिलेली बातमी आढळली. त्यानुसार, हा व्हिडियो सौदी अरेबिया नाही. हा व्हिडियो मूळात येमेन येथील आहे. हुसैन अल-सकेत नामक तरुणाने एका चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून बलात्कार केला होता. त्यानंतर तिची हत्यासुद्धा केली होती. याप्रकरणी त्याला भर चौकात गोळी मारण्याची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानुसार, येमेनची राजधान सना येथील तहरीर चौकात हुसैनला पाच गोळ्या मारण्यात आल्या व नंतर क्रेनद्वारे लटकविण्यात आले.

मूळ बातमी येथे वाचा – न्यूयॉर्क पोस्ट । अर्काइव्ह । डेली मेल
इंडिपेडंट (यूके) वेबसाईटवरील बातमीनुसार, हुसैनने चारवर्षीय मुलीचे नोव्हेंबर 2015 मध्ये अपहरण करून बलात्कार केला होता. त्याला अशा प्रकारे सार्वजनिक शिक्षा मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने आनंद व्यक्त करीत म्हटले होते की, “तब्बल एक वर्ष आठ महिन्यांनी माझ्या मुलीला न्याय मिळाला.” याचा अर्थ गुन्हेगाराला 15 मिनिटांत शिक्षा नव्हती मिळाली.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे येमेनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून यादीव माजलेली आहे. संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या बंडखोर संघटनांचा संघर्ष सुरू आहे. हौथी बंडखोरांनी 2014 पासून राजधानी सना शहराचा ताबा मिळवलेला आहे. हौथी बंडखोर हे झाईदी शिया आहेत. त्यांना इराणचा पाठिंबा आहे. परंतु, सुन्नी समर्थक सौदी अरेबिया त्यांच्या विरोधात लढा देत आहे.
हौथी बंडखोरांनी आपली ताकद दाखवण्यासाठी 2017 साली एकाच महिन्यात दोन बलात्कारातील गुन्हेगारांना अशा प्रकारे भर चौकात गोळी मारण्याची शिक्षा दिली होती. हा काही संसदमान्य येमेन सरकारचा निर्णय नव्हता. त्यामुळे येमेनमध्ये अशाप्रकारे शिक्षा दिली असे म्हणनेदेखील सयुक्तिक नाही. ही केवळ बंडखोरांनी दिलेली शिक्षा आहे.

सौदी अरेबियामध्ये बलात्कारासाठी काय शिक्षा आहे?
सौदी अरेबियामध्ये शरिया कायद्यानुसार न्यायप्रणाली आहे. सौदीमध्ये बलात्कारासाठी मृत्यदंड देण्याची तरतूद असली तरी, बलात्काराच्या गुन्ह्यासंदर्भात पिनल कोड नाही. तसेच बलात्काराची व्याख्यादेखील स्पष्ट नाही.
निष्कर्ष
बलात्कार करण्याऱ्या गुन्हेगारास भर चौकात गोळी मारून शिक्षा देण्याचा व्हिडियो सौदी अरेबियातील नाही. हा व्हिडियो येमेनमधील आहे. तेथील हौथी बंडखोरांनी ही शिक्षा दिली होती. त्याला संसदमान्य सरकारचा निर्णय म्हणता येणार नाही. तसेच गुन्हेगाराला 15 मिनिटांत नाही तर, सुमारे 20 महिन्यांनी दंड झाला होता. त्यामुळे हा व्हिडियो चुकीच्या माहितीसह पसरविला जात आहे.

Title:बलात्कार करणाऱ्याला 15 मिनिटांत गोळी मारल्याचा हा व्हिडियो सौदी अरेबियामधील नाही. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
