नेपाळमधील गारपीटीचा व्हिडियो छत्तीसगडमधील म्हणून व्हयरल. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

छत्तीसगडमध्ये नुकतीच जोरदार गारपीट झाली. मोठ्या-मोठ्या गारांमुळे लोकांची घरे, वाहने, पिकांचे नुकसान झाले. त्याचे फोटो वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले. यासोबतच गारपीटीचा एक व्हिडियोदेखील प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गोल्फ बॉलच्या आकाराच्या गारा शेतात साचलेल्या पाण्यात पडताना दिसतात. तसेच पत्रावर आदळणाऱ्या गारांच्या आवाजावरून तर असे वाटते की, जणू काही कोणी तरी आकाशातून गोळीबार करीत आहे. हा व्हिडियो छत्तीसगडमधील असल्याचा दावा केला जात आहे.

फॅक्ट क्रेसेंडोने या व्हिडियोची पडताळणी केली असता हा व्हिडियो नेपाळचा असल्याचे सिद्ध झाले.

काय आहे पोस्टमध्ये?

मराठी फेसबुक पेजेसनेदेखील गारपीटीचा व्हिडियो शेयर करून म्हटले की, ही बॉम्ब किंवा गोळीबारी नाही तर दिंडोरी, छत्तीसगड येथे झालेली गारपीट आहे, पाहून आवक व्हाल. 

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

छत्तीसगडच्या कबीरधाम येथील कलेक्टर अवनीश शरण यांनी गारपीटीचा हा व्हिडियो छत्तीसगडमधील पेंड्रा गावातील असल्याचे म्हटले आहे. हाच व्हिडियो इंटरनेटवर त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँडचा म्हणूनही व्हायरल होत आहे. न्यूज-18 इंडियाने तर कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय हा व्हिडियो व्हिएतनाममधील असल्याचे म्हटले.

मग हा व्हिडियो नेमका आहे तरी कुठला?

तथ्य पडताळणी

हा व्हिडियो वेगवेगळ्या ठिकाणांचा म्हणून व्हायरल होत असल्यामुळे त्याची पडताळणी करणे गरजेचे आहे. सर्वप्रथम हा व्हिडियो इंटरनेटवर कधीपासून उपलब्ध आहे हे तपासले. विविध की-वर्ड्सच्या माध्यमातून सर्च केल्यावर 19 एप्रिल रोजी अपलोड करण्यात आलेला एक युट्यूब व्हिडियो आढळला. तो तुम्ही खाली पाहू शकता.

वरील व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर दिसेल की, हा व्हिडियो टिकटॉकवरून घेण्यात आला आहे. दिवाकर बारटौला (@diwakarbartaula) नामक व्यक्तीच्या टिकटॉक अकाउंटवर हा व्हिडियो 18 एप्रिल रोजी अपलोड करण्यात आला होता. सोबत नेपाळी भाषेतील कॅप्शनमध्ये म्हटले की, “पबजी गेममध्ये जसा गोळीबार होता तशीच आज गारपीट झाली.”

@diwakarbartaula

Aaj ko Asina pubg ma vanda badi gun chalya jasto..😭😭##makethisviral ##tiktoknepal ##goviral ##chitwan_muser

♬ original sound – Diwakar Bartaula

मूळ व्हिडियो येथे पाहा – टिकटॉक

दिवाकर बारटौला यांनी “#chitwan_muser” असा हॅशटॅग वापरला आहे. चितवन हा नेपाळमधील एक जिल्हा आहे. हा धागा पकडून मग शोध केवळ नेपाळपुरता मर्यादित केला. गारपीटीचा हा व्हिडियो चितवनमधील असल्याचा म्हणून शेयर करण्यात आल्याचे आढळले.

पण हा व्हिडियो तेथीलच असल्याचे कसे सिद्ध होईल?

फॅक्ट क्रेसेंडोने मग दिवाकर बारटौला यांचे मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क केला. त्यांनी हा व्हिडियो दिवाकर यांनीच काढल्याचे आम्हाला सांगतिले. मग दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर आमचा दिवाकर बारटौला यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी सांगितले की, हा व्हिडियो त्यांनीच चित्रित केला होता.

“हा व्हिडियो मी काढला आहे. गडौली गावातील मी रहिवासी असून, माझ्या शेतात 18 एप्रिल रोजी हा व्हिडियो मोबाईलमध्ये काढला होता. त्या दिवशी आमच्या गावात जोरदार गारपीट झाली होती,” असे बारटौल यांनी फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले.

हा व्हिडियो त्यांच्याच शेतातील आहे हे सिद्ध करण्यासाठी मग आम्ही त्यांना शेतात जाऊन व्हायरल व्हिडियो जेथून काढला होता तेथूनच आणखी एक व्हिडियो चित्रित करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी तेथे जाऊन एक व्हिडियो आम्हाला पाठवला. त्यामध्ये व्हायरल व्हिडियोत दिसणारे खांब आणि झाडं स्पष्ट दिसतात. एवढंच नाही तर, व्हिडियोच्या शेवटी पत्राचे घरदेखील दिसते. याच पत्रांवर गारपीट आदळून गोळीबारासारखा आवाज येत होता. बारटौला यांनी पाठवलेला व्हिडियो आपण खाली पाहू शकता.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, हा व्हिडियो भारत किंवा व्हिएतनाममधील नाही. हा व्हिडियो नेपाळमधील आहे. दिवाकर बारटौला नामक व्यक्तीने 18 एप्रिल रोजी तेथील गडौली गावात हा व्हिडियो काढला होता. या व्हिडियोला वेगवेगळ्या ठिकाणचा म्हणून फिरवला जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नये.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:नेपाळमधील गारपीटीचा व्हिडियो छत्तीसगडमधील म्हणून व्हयरल. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False