
भारतामध्ये पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबणे तशी नवी बाब नाही. मुंबईमध्ये तर हा दरवर्षीची ओरड आहे. यंदाचे वर्षसुद्धा त्याला अपवाद नाही. या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे मुंबई अनेक दिवस बंद राहिली. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास जागाच नसल्यामुळे ही समस्या उद्भवते. वरून नाल्याचे पाणी आणि उघड्यावरील कचरा तुंबलेल्या पाण्यात मिसळून असह्य दुर्गंधी आणि आरोग्याला धोका निर्माण होतो.
इतर देशांमध्येसुद्धा पावसामुळे रस्त्यावर पाणी साचते. परंतु, तेथे कसे स्वच्छ रस्ते असतात हे दाखवणारा व्हिडियो सोशल मीडियावर फिरत आहे. यामध्ये गुडघ्याइतके पाणी साचूनसुद्धा रस्ता चकाचक आणि स्वच्छ दिसतो. हा व्हिडियो स्वित्झर्लंडमधील असल्याचा दावा करण्यात येत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
मूळ पोस्ट आणि व्हिडियो येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
काय आहे पोस्टमध्ये?
पोस्टमध्ये शेयर केलेल्या व्हिडियोमध्ये एक कार पाण्यातून जाताना दिसते. रस्त्यावर किमान गुडघाभर तरी पाणी साचले आहे. परंतु, रस्ता एकदम स्वच्छ दिसतो. सोबत लिहिले की, जगात सगळीकडे कधी कधी जोरात पाऊस येतो.. खूप ठिकाणी पाणी भरत.. पण तिथल्या साचलेल्या पाण्यात गटार नाले यांची घाण मिसळत नाही. याचच एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वित्झर्लंड मध्ये पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते पण पाणी एवढे साफ होते की बिल्डिंगवरुन बघितले असता पाणी साचले नाही आहे असेच दिसते. ह्यावरून कळते की तिथल्या प्रशासनाला त्यांच्या शहरांची किती काळजी आहे.
हाच व्हिडियो स्वित्झर्लंडचा म्हणून शेयरचॅट या सोशल मीडिया वेबसाईटवरसुद्धा फिरवला जातोय.
तथ्य पडताळणी
व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर दिसते की, डावीकडून वरच्या कोपऱ्यात BOSTON असे लिहिलेले आहे. तसेच, या व्हिडियोचा स्रोत म्हणून David Caruso/Storyful यांचे नाव दिले आहे. हा धागा पकडून गुगलवर शोध घेतला असता कळाले की, हा व्हिडियो अमेरिकेतील बॉस्टन शहरतील आहे. स्टोरीफुल न्यूज या वेबसाईटच्या डेलीमोशन अकाउंटवर हा व्हिडियो 2 मार्च 2018 रोजी शेयर करण्यात आला होता.
मूळ व्हिडियो येथे पाहा – Daily Motion
स्टोरीफुल न्यूजनुसार, नॉर्थइस्टर चक्रीवादळाचा गेल्या वर्षी अमेरिकेच्या मॅसाच्युएट्स किनारपट्टीला तडाखा बसला होता. वादळामुळे 2 मार्च 2018 रोजी बॉस्टन शहरासह आसपासच्या भागात मुसळाधार पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. हा व्हिडियो डेव्हिड करुसो यांनी बॉस्टन शहरात काढला होता. यामध्ये रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याचे दिसते.
हा व्हिडियो जगभरातील मीडियाने वापरला होता. उदाहरणार्थ, याहू न्यूज, द ऑस्ट्रेलियन, न्यूज ऑस्ट्रेलिया. सीबीएस बॉस्टनच्या युट्युब चॅनेलवरसुद्धा हा व्हिडियो शेयर करण्यात आला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.
निष्कर्ष
यावरून हे सिद्ध होते की, रस्त्यावर पुराचे पाणी साचलेला व्हिडियो स्वित्झर्लंडमधील नाही. हा व्हिडियो अमेरिकेतील बॉस्टन शहरातील आहे. नॉर्थइस्टर चक्रीवादळामुळे 2 मार्च 2018 रोजी तेथे असे पाणी साचले होते.

Title:अमेरिकेतील बॉस्टन शहरातील पुराचा व्हिडियो स्वित्झर्लंडमधील म्हणून होतोय शेयर. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
