
देशातील कोरोना संकटाला रोखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार पूर्णतः अपयशी ठरले, अशी टीका करणाऱ्या एका महिलीची व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की, ही महिला भाजप खासदार मनेका गांधी आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, ही महिला मनेका गांधी नाहीत.
काय आहे दावा?
सुमारे तीन मिनिटांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला म्हणते की, “माझ्या 36 वर्षांच्या आयुष्यात मी इतका आंधळा पंतप्रधान, इतका आंधळा गृहमंत्री, इतका आरोग्यमंत्री मी पाहिलेला नाही. कोरोना रोखण्यात तुम्ही सगळे सपशेल अपयशी ठरले आहात.”
कॅप्शनमध्ये म्हटले की, “भाजपाच्या माजी मंत्री आणि खासदार मेनका गांधी यांचा संयम सुटला आणि केला जोरदार प्रहार. आता खरं तर तोंडं काळी करण्याची वेळ आलीय.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह । फेसबुक । अर्काइव्ह
या व्हिडिओतील एक भाग ट्विटरवर याच कॅप्शनसह शेअर केला जात आहे.
तथ्य पडताळणी
मनेका गांधी यांनी भाजप किंवा नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याची कोणतीही बातमी आढळली नाही. त्यांनी जर खरंच असा व्हिडिओ तयार केला असता तर मीडियामध्ये तो खूप गाजला असता. परंतु, असे काही झाल्याचे दिसत नाही.
व्हिडिओमधील महिला तिचे वय 36 वर्ष सांगते. मनेका गांधी यांचे वय सध्या 64 वर्ष आहे. यामुळे ही महिला नेमका कोण हा प्रश्न पडतो.
READ : भाजप कार्यकर्त्यांनी लस घेण्याचे नाटक केले का? वाचा ‘त्या’ व्हिडिओमागचे सत्य
सोशल मीडियावर शोध घेतल्यावर कळाले की, या महिलेचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्याद्वारे कळाले की, या महिलेचे नाव डॉली शर्मा आहे. त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरील माहितीनुसार, त्या उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये राहतात.
मूळ पोस्ट – फेसबुक
डॉली शर्मा यांनी 20 एप्रलि रोजी फेसबुक लाईव्हद्वारे गाझियाबादमधील दयनीय कोविड परिस्थितीबद्दल भाजपवर टीका केली होती. या व्हिडिओतील तीन मिनिटांची क्लिप कट करून सोशल मीडियावर व्हायरल झाली. तो भाग आपण 14.15 मिनिटांपासून पुढे पाहू शकता.
डॉली शर्मा यांनी 2019 साली गाझियाबाद येथून काँग्रेसतर्फे लोकसभा निवडणूक लढविली होती.
READ: मोदींचा मुखवटा घातलेल्या भाजप उमेदवाराला बिहारमध्ये हाकलून लावण्यात आले का? वाचा सत्य
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओमधील महिला मनेका गांधी नाहीत. त्यांचे नाव डॉली शर्मा असून, त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे मनेका गांधी यांनी भाजप व नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केल्याचा दावा असत्य ठरतो.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:भाजप आणि मोदींवर खरमरीत टीका करणारी ही महिला मनेका गांधी नाही;
Fact Check By: Agastya DeokarResult: False
