अस्वलाच्या या पिल्लाला ऑस्ट्रेलियाच्या आगीतून वाचवण्यात आले नव्हते. वाचा सत्य

False आंतरराष्ट्रीय | International

ऑस्ट्रेलियामध्ये पेटलेल्या भीषण वणव्यामुळे लाखो वन्यप्राण्यांचे बळी गेले आहेत. आगीमुळे प्राणी जीव वाचवून सुरक्षित ठिकाणी आसरा शोधत आहेत. अशा संकटवेळी अग्नीशामक दलाच्या जवानांसह सामान्य नागरिकांनी हजारो प्राण्यांचे जीव वाचवले. 

सोशल मीडियावर एका अस्वलाच्या गोंडस पिल्लाचा व्हिडियो आणि फोटो शेयर करून दावा केला जात आहे की, ऑस्ट्रेलियातील जंगलात लागेलेल्या आगीत एका नागरिकाने या पिल्लाला वाचवले होते. त्यामुळे पिल्लाने या माणसाच्या पायाला मिठी मारून असे आभार मानले. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

काय आहे पोस्टमध्ये?

ऑस्ट्रेलिया मध्ये जंगलात लागलेल्या वणव्यातुन या अस्वलाच्या पिल्लाला तेथील या नागरिकाने वाचवले त्याने अक्षरशः त्याला कवटाळले,माणसापेक्षा प्राण्यांना भावना किती असतात याहून कळतेय!!

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक

तथ्य पडताळणी

सदरील पोस्टमधील फोटोला गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळते की, अस्वलाच्या पिल्लाचे हे फोटो एका व्हिडियोतून घेतलेले आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून हा व्हिडियो इंटरनेटवर उपलब्ध आहे. आम्हाला सगळ्यात जुना व्हिडियो 2011 साली अपलोड झालेला मिळाला. 

MrOkras नावाच्या युट्यूब चॅनेलवर 5 ऑगस्ट 2011 रोजी “Brown bear attack on man!” (रशियातून भाषांतर) नावाने हा व्हिडियो अपलोड करण्यात आला होता. या व्हिडियोला 18 लाखांपेक्षा जास्त व्ह्युवज मिळाले आहेत. हा व्हिडियो तुम्ही खाली पाहू शकता.

हा व्हिडियो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रतिष्ठित वेबसाईट्सने यावर आर्टिकल प्रसिद्ध केले. अस्वलाच्या गोंडस पिल्लाने एका नागरिकावर केलेला “खोटा खोटा” हल्ला म्हणूनच या व्हिडियोचे वर्णन करण्यात आले आहे.

हफिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, हा व्हिडियो रशियातील आहे. तेथील एका पार्कमध्ये अस्वलाच्या या पिल्लानी पार्कमध्ये आलेल्या एका नागरिकाच्या पायाशी खेळायला सुरूवात केली. यामध्ये कुठेही आगीतून पिल्लाला वाचवले किंवा त्या आशयाची माहिती नाही.

डिजिटल स्पायनेदेखील वरील व्हिडियो देऊन बातमी केली होती. पार्कमध्ये आलेल्या एका व्यक्तीवर या लहान पिल्लाने असा हल्ला केला होता, असेच यामध्ये म्हटले आहे. यावरून स्पष्ट होते की, या पिल्लाला आगीतून वाचवण्यात आले नव्हते. हा रशियातील एका पार्कमधील व्हिडियो आहे.

विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये ‘ब्राऊन बेयर’ (अस्वल) आढळतच नाही. अस्वलाच्या पिल्लाचा अधिक लांबीचा 2 मिनिटांचा व्हिडियो खाली पाहू शकता.

निष्कर्ष

हा व्हिडियो ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीतून वाचवलेल्या अस्वलाच्या पिल्लाचा नाही. हा व्हिडियो रशियातील एका पार्कमधील आहे. 2011 पासून तो इंटरनेटवर उपलब्ध आहे.

Avatar

Title:अस्वलाच्या या पिल्लाला ऑस्ट्रेलियाच्या आगीतून वाचवण्यात आले नव्हते. वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False