रत्नाकर मतकरी यांना कोरोना कसा झाला हे सांगणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका; वाचा सत्य

Coronavirus False

प्रसिद्ध लेखक रत्नाकर मतकरी यांचे 17 मे रोजी कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबईत निधन झाले. मतकरी यांनी कोरोना कसा झाला याविषयी एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रेवती भागवत यांच्या नावे फिरणाऱ्या या मेसेजमध्ये म्हटले की, घरी आलेल्या वस्तूंच्या पिशव्या न धुतल्यामुळे त्यांना कोरोना झाला असावा. मतकरी कुटुंबियांशी बोलल्यानंतर रेवती यांना रत्नाकर मतकरी यांना  कोविड-19 चा संसर्ग कसा झाला हे समजले, असेदेखील मेसेजमध्ये म्हटले आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी या मेसेजच्या सत्यतेविषयी पडताळणी करण्याची विनंती केली. त्यानुसार शोध घेतला असता हा मेसेजमध्ये काही तथ्य नसल्याचे समोर आले.

काय आहे मेसेजमध्ये?

Matkari-1.png

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सोशल मीडियावर याविषयी शोध घेतला असता, पत्रकार अमोल परचुरे यांची एक पोस्ट आढळली. सदरील मेसेज व्हायरल झाल्यानंतर त्यांनी रत्नाकर मतकरी यांचे चिरंजीव गणेश मतकरी यांच्याशी बोलून ही पोस्ट लिहिली. 

यामध्ये त्यांनी म्हटले की, “रत्नाकर मतकरी यांचं निधन कोरोनामुळे झालं, हे क्लेशदायक आहे. त्यांना संसर्ग कसा झाला असेल असाही प्रश्न कालपासून डोक्यात होताच. त्यातच आज रेवती भागवत यांची एक पोस्ट फिरायला लागली. ती पोस्ट बघून गणेशशी बोललो, तर तो आधीच या पोस्टमुळे येणाऱ्या फोन्सनी थोडा वैतागलाच होता. गणेश, सुप्रिया वा प्रतिभाताई यांचं या दोन दिवसात भागवतांशी बोलणं झालेलं नाही.”

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुकअर्काइव्ह

गणेश मतकरी यांनीदेखील या व्हायरल मेसेजविषयी खुलासा करणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटले की, “व्हॉट्सअपवर व्हायरल झालेल्या रेवती भागवत यांच्या पोस्टमधे जे आहे त्यात काहीही तथ्य नाही आणि त्यात लिहिल्याप्रमाणे त्या कुटुंबियांशी बोललेल्या नाहीत. मी, माझी आई आणि बहीण यांचं भागवतांशी बोलणं झालेलं नाही, आणि त्यात काढलेले निष्कर्ष मुळातच तर्काला धरुन नाहीत.”

रत्नाकरी मतकरी यांच्याविषयी व्हायरल होणारा तो मेसेज पुढे शेयर न करण्याचे आवाहन करीत ते म्हणाले की, “एका अतिशय दु:खद घटनेला चुकीचे फाटे फोडून चालवलेला हा अजेंडा थांबावा असं आम्हाला वाटतं. जनतेच्या सुरक्षेच्या स्वतंत्र पोस्ट जरुर कराव्यात. त्यात मतकरींचं नाव कृपया गुंफू नये.”

मूळ पोस्ट येथे वाचा – फेसबुकअर्काइव्ह

निष्कर्ष

रत्नाकर मतकरी यांना कोरोनाचा संसर्ग कसा झाला हे सांगणाऱ्या रेवती भागवत यांच्या मेसेजमध्ये काही तथ्य नसल्याचे मतकरी कुटुंबियांनी स्पष्ट केले आहे. रेवती भागवत यांच्याशी मतकरी कुटुंबियांचे काहीही बोलणे झाले नसतानाही रेवती यांनी तसे बोलणे झाल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे या मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

Avatar

Title:रत्नाकर मतकरी यांना कोरोना कसा झाला हे सांगणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नका; वाचा सत्य

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False