मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झाल्याचा व्हिडिओ दोन महिन्यांनी समोर आल्यानंतर पोलिसांनी काही आरोपींना अटक केली. कुकी समाजातील महिलांवर मैतेई समुदायातील काही लोकांनी अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे. 

या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर रॅलीचे व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, कुकी महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना अटक केल्याच्या विरोधात बहुसंख्य मैतेई गटाकडून मणिपूरमध्ये निषेध रॅली काढण्यात आली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा चुकीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक हातात फलक आणि पोस्टर घेऊन चालत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स कॅप्शनमध्ये लिहितात की, “कुकी महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना अटक केल्याच्या विरोधात बहुसंख्य मैतेई गटाकडून मणिपूरमध्ये अशी निषेध रॅली काढण्यात आली.”

मूळ पोस्ट – फेसबुक 

सिआसत डेली या वृत्तपत्राने हा व्हायरल फोटो शेअर करत बातमी प्रसिद्ध केली की, “मणिपूर: व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आरोपींच्या अटकेविरोधात मैतेईंचा निषेध.”

मूळ पोस्ट – सिआसत डेली | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर केल्यावर कळाले की, ही रॅली आरोपींच्या समर्थनार्थ काढलेली नव्हती.

इम्फाल टाईम्सच्या बातमीनुसार 29 जुलै रोजी राज्यातील अंमली पदार्थांविरोधात रॅली काढण्यात आली होती.

खालील बातमीच्या स्क्रीनशॉटध्ये “मास रैली अगेंस्ट चीन कुकी नार्को टेररिज्म- COCUMI।” असे लिहिलेले पाहू शकतात.

या संबंधित अधिक सर्च केल्यावर कळाले की, टॉम टीव्ही या युट्यूब चॅनलने या रॅलीचा व्हिडिओ त्याच दिवशी अपलोड केला आहे. 

हप्ता कांगजेबुंग ते इंफाळ येथील थाऊ मैदानापर्यंत ही रॅली काढण्यात आली होती. हिंसक संघर्ष संपुष्टात आणणे, एनआरसीची अंमलबजावणी करणे, संपूर्ण मणिपूरसाठी एकसमान प्रशासनाची मागणी करणारा ठराव संमत करून आणि मणिपूरमधील नार्को-दहशतवादाच्या विरोधात ही रॅली काढण्यात आली होती.

https://youtu.be/pV34Fr5g8A8

इम्फाल फ्री प्रेसच्या बातमीनुसार ही रॅली विविध भागातून जात असताना ठिकठिकाणी लोक त्यात सामील होत होते.

तसेच आंदोलकांनी “मणिपूरमध्ये वेगळे प्रशासन नाही”, “कुकी-झो नार्को आतंवादपासून भारताला वाचवा”, “नार्को-दहशतवाद रद्द करा”, “महिलांवर अत्याचार नको”, “NRC तात्काळ अपडेट करा” आणि इतर असे पोस्टर हातात घेतले होते.

दुसरी रॅली मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात अपुनबा क्लबने आयोजित केली होती, ज्याची बातमी इंफाळ फ्री प्रेसने शेअर केला होता.

परंतु, नेटकर्यांनी मागील रॅलीतील फोटो शेअर केला होता, ज्यामुळे गोंधळ उडाला होता.

फ्री प्रेसने ट्विट द्वारे ही बातमी आता काढून ठकण्यात आल्याचे सांगितल गेल आहे.

https://twitter.com/ImphalFreePress/status/1685258230958882817?s=20

पहिली रॅली

मणिपूर इंटिग्रिटी कमिटी (COCUMI) गटाने मणिपूरमधील चिन-कुकी समुदायातर्फे कथितरित्या चालविण्यात येणारा नार्को-दहशतवाद संपवण्यासाठी आणि राज्याला एकत्र आणण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते. व्हायरल झालेला फोटो त्याच रॅलीचा आहे.

दुसरी रॅली

ही रॅली मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात झालेल्या पहिल्या रॅलीपेक्षा लहान होती आणि व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील आरोपींच्या अटकेच्या विरोधात अपुनबा क्लब आणि मीरा फिबिस यांनी आयोजित केली होती.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटोमधील रॅली कुकी महिलांवर सार्वजनिकरित्या लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना अटक केल्याच्या विरोधात मैतेई गटाकडून रॅली काढण्यात आली नव्हती. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:मणिपूरमध्ये सामूहिक अत्याचार: आरोपींच्या अटकेविरोधात मैतेई समाजाने रॅली काढली नाही

Written By: Sagar Rawate

Result: False