
सुधारित नागरिकत्व कायद्यावरून दिल्लीमध्ये सध्या हिंसाचार सुरू आहे. यामध्ये मृत पावलेल्यांची संख्या आता नऊपर्यंत गेली आहे. मृतांमध्ये एका पोलिस हेड कॉन्स्टेबलचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर सांप्रदायिक व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टला ऊत आला आहे.
अशाच एका व्हिडियोमध्ये बसचालकाला काही तरुण मारहाण करताना दिसतात. दिल्लीत सुरू असलेल्या दंगलीतील हा व्हिडियो असल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा खोटा सिद्ध झाला. हा व्हिडियो मराठवाड्यात घडलेल्या घटनेचा आहे.
काय आहे व्हिडियोमध्ये?
28 सेंकदाच्या क्लिपमध्ये बस समोर एक कार उभी राहते आणि मग काही लोक बसचालकाला शिवीगाळ करीत काठ्यांनी मारहाण करतात. बसच्या आतून या घटनेची शुटिंग करण्यात आली आहे. ट्विटरवर एका युजरने लिहिले की, दिल्ली दंगलीदरम्यान संविधानाचा सन्मान करीत शांततापूर्ण आंदोलन करताना कार्यकर्ते.
दुसऱ्या एका युजरने या व्हिडियोची सीएए-एनआरसी विरोध प्रदर्शानांशी संबंध जोडला. त्याने लिहिले की, सीएए-एनआरसीला विरोध तर केवळ निमित्त आहे. या लोकांना खरं तर भारताला सीरिया करायचे आहे.
तथ्य पडताळणी
सदरील व्हिडियो गेल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला होता. विविध मीडिया रिपोर्ट नुसार, हा व्हिडियो कन्नड येथे 18 फेब्रुवारी औरंगाबद-शिरपुर बसवर झालेल्या हल्ल्याचा आहे. ओव्हर टेक करण्यासाठी जागा न दिल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी बसचालकाला बेदम मारहाण केली होती, अशी माहिती एबीपी माझाने दिली.
महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, कन्नडच्या आसपास सुमारे 10 ते 15 तरुणांनी शिरपूर आगाराच्या बसवर हल्ला चढवित लाठ्याकाठ्या घेऊन बसचालक सुधाकर श्यामराव शिरसाट यांना मारहाण करत एसटीच्या काचा फोडल्या. भररस्त्यावरच हा प्रकार घडल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. तसेच अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता.
घटनेची माहिती मिळताच कन्नड पोलिस घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी हल्लेखोरांपैकी अनेक जण पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, संशयितांची नावे अलीम मकबूल शहा आणि रिजवान सलीम शेख अशी संशयितांची नावे आहेत.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, बसचालकाला मारहाणीचा हा व्हिडियो दिल्लीचा नाही. तो औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील आहे. कारला समोर जाण्यास जागा न दिल्यामुळे संतप्त झालेल्या 10 ते 15 जणांनी बसचालकाला मारहाण केली होती. त्याचा हा व्हिडियो आहे. या घटनेचा दिल्लीतील दंगल किंवा सीएए-एनआरसी आंदोलनाशी काही संबंध नाही.

Title:मराठवाड्यात बस चालकाला झालेल्या मारहाणीचा व्हिडियो दिल्लीतील हिंसाचाराचा म्हणून व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
