मोदींनी महाबलीपूरम येथे केलेल्या स्वच्छतेच्या शुटिंगची तयारी म्हणून स्कॉटलंडमधील फोटो व्हायरल

False राजकीय | Political

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाबलीपूरम येथील समुद्र किनारी शनिवारी (ता. 12) सकाळी केलेल्या स्वच्छेतेच्या व्हिडियोवरून वेगवेगळे दावे केले जात आहे. मोदींनी स्वतः किनाऱ्यावर कचरा टाकला आणि मग तो गोळा करण्याचे नाटक केल्याची बनावट क्लिप व्हायरल झाली होती. फॅक्ट क्रेसेंडोने तिचे सत्य समोर आणले. मोदींनी स्वच्छता करण्यापूर्वी शुटिंगची कशी जय्यत तयारी केली होती हे दाखविणारे फोटो आता समोर आल्याचा दावा केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची तथ्य पडताळणी केली.

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकफेसबुक 

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये महाबलीपूरम समुद्र किनाऱ्यावर मोदी स्वच्छता करतानाच्या फोटोसोबत शुटींग करणाऱ्या टीमचा फोटो शेयर केलेला आहे. तसेच मेटल डिटेक्टरने किनाऱ्यावरील वाळू तपासणीदेखील केली जात आहे. हे फोटो शेयर करून एकाने लिहिले की, या पेक्षा दुसरा निवडणुक स्टंट काय असू शकतो?. दुसरा म्हणतो की, सोशल मीडियावर सध्या एक विडिओ पाहताच असाल मा. नरेंद्र मोदी एका बीचवर सफाई करतांनाचा. पण त्या मागचे सत्यता खालील प्रमाणे.

तथ्य पडताळणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 ऑक्टोबर रोजी ट्विटवरवर महाबलीपूरम समुद्र किनाऱ्यावर साफसफाई करतनाचा व्हिडियो शेयर केला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता. यामध्ये त्यांनी लिहिले होते की, महाबलीपूरम येथील समुद्र किनारी सकाळ सकाळी अर्धा तास साफसफाई केली. प्लॅस्टिकचा कचरा वेचून तो हॉटेलचा स्टाफ जयराज यांच्याकडे दिला. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याची आणि ती जागा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तसेच आपण सर्व आरोग्यसंपन्न राहण्यासाठी प्रयत्न करूयात.

अर्काइव्ह

गुगलवर वरील फोटोंविषयी शोध घेतला असता कळाले की, कार्ती चिदंबरम यांनी शुटिंग क्रूचे फोटो शेयर केला होता. त्याला उत्तर देताना अनेकांनी तो फोटो महाबलीपूरम येथील नसल्याचे सांगितले. तो शुटिंग क्रूचा फोटो तर भारतातीलसुद्धा नाही. हे फोटो टेस्क्रीन नावाच्या वेबसाईट पेजवरील असल्याचे समोर आले. टेस्क्रीन ही स्कॉटलंडमधील एक कंपनी आहे जी फाईफ व टेसाईड भागात चित्रिकरणासाठी मदत करते. 

व्हायरल पोस्टमधील फोटो आणि मूळ फोटो यांची तुलना केल्यावर लक्षात येते की, हा फोटो क्रॉप करून तो मोदींच्या शुटिंगची तयारी म्हणून पसरविण्यात येत आहे.

मूळ फोटो येथे पाहा – TayScreen

तसेच, मेटल डिटेक्टरने किनाऱ्यावरील वाळूची तपासणी करतानाचा फोटोसुद्धा तमिळनाडूनच्या महाबलीपूरम किनाऱ्यावरील नाही. द हिंदू वेबसाईटवरील 11 एप्रिल 2019 रोजीच्या बातमीत हा फोटो प्रकाशित झाला होता. त्यानुसार, गेल्या लोकसभेत केरळमधील कोझीकोड येथे नरेंद्र मोदींच्या सभेआधी बॉम्बशोध पथकातर्फे सुरक्षा तपासणी करतानाचा हा फोटो आहे.

मूळ बातमी येथे वाचा – द हिंदूअर्काइव्ह

ही स्टोरी इंडिया टुडे, क्विंट, ऑल्ट न्यूज यांनीसुद्धा फॅक्ट केली आहे.

निष्कर्ष

यावरून हे सिद्ध होते की, सदरील पोस्टमधील फोटो जुने असून, त्यांचा मोदींच्या साफसफाईच्या व्हिडिशोयीशी काही संबंध नाही. शुटिंग क्रूचा फोटो स्कॉटलंडमधील आहे तर, मेटल डिटेक्टरने किनाऱ्यावरील वाळूची तपासणी करण्याचा फोटो केरळमधील कोझिकोड शहरातील आहे. त्यामुळे ही पोस्ट युजर्सला चुकीच्या माहिती देते. 

Avatar

Title:मोदींनी महाबलीपूरम येथे केलेल्या स्वच्छतेच्या शुटिंगची तयारी म्हणून स्कॉटलंडमधील फोटो व्हायरल

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False