
वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अलिकडे वाढ झालेली दिसते. जंगलातील हे हिंस्र प्राणी मानववस्तीत आल्याच्या बातम्या आपण वाचतच असतो. सध्या अशाच एका वाघ हल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेयर केले जात आहेत. विदर्भात वाघाने मोटरसायकलवर हल्लाकरून एकाचा बळी घेतल्याचा दावा केला जात आहे. पुरावा म्हणून काही फोटोसुद्धा दिले जातात. फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो व्हॉट्सअॅप क्रमांकावर (9049043487) पाठवून तथ्य पताळणी करण्याची विनंती केली.

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक
काय आहे पोस्टमध्ये?
व्हॉट्सअॅपवर फिरत असलेल्या मेसेजमध्ये म्टले की, यवतमाळ रोडवर वाघाने मोटरसायकरवर हल्ला करून घेतला बळी. सोबत वाघाचा आणि रस्त्यावर दुचाकी पडल्याचा फोटो आहे. फेसबुकवर हाच फोटो शेयर करून दावा केलेला आहे की, गडचिरोली जिल्ह्यात चांदाळा ते जांभळी रोडवर वाघाने मोटरसायकलवर हल्ला करून घेतला बळी. तर मग आपण याचे सत्य जाणून घेऊया.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम विदर्भातील यवतमाळ किंवा गडचिरोलीमध्ये मोटरसायकलवर वाघाने हल्ला करून एकाचा बळी घेतला का याचा शोध घेतला. गुगलवर अशी कोणतीही बातमी आढळली नाही. तसेच हे फोटोसुद्धा आढळले नाही. त्यामुळे मग या फोटोची सत्यता तपासली.
फोटोंचे निरीक्षण केल्यावर कळते की, एका फोटोत वाघ आहे तर दुसऱ्या फोटोत बिबट्या आहे. वाघाचा फोटो रात्रीचा आहे तर बिबट्याचा फोटो दिवसाचा आहे. गुगल रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हे फोटो विदर्भातील नाहीच.
सर्वप्रथम वाघाचा फोटो कुठला आहे ते पाहुया. हा फोटो 2016 मधील आहे. मध्यप्रदेशमधील जंगलात केरवा आणि कालियसोट दरम्यानच्या जंगलात वाघाने केलेल्या शिकारीचा फोटो भोपाळ वनविभागाने काढला होता. हिंदुस्थान टाईम्सने 7 फेब्रुवारी 2016 रोजी हा फोटो प्रसिद्ध केला होता. भोपाळच्या आसपास दोन वाघांचा वावर वाढल्यानंतर रात्रीच्या वेळी पॅट्रोलिंग वाढवण्यात आले होते. तेव्हा हा फोटो काढण्यात आला होता. याचा अर्थ हा फोटो विदर्भातील नाही.

मूळ बातमी येथे वाचा – हिंदुस्थान टाईम्स । अर्काइव्ह
रस्त्यावर पडलेल्या दुचाकींशेजारी बसलेल्या बिबट्याचा फोटोसुद्धा विदर्भातील नाही. सकाळच्या बातमीनुसार, हा फोटा चिपळूणमधील गाणेखडपोली येथील आहे. 11 डिसेंबर 2018 रोजी प्रदिद्ध केलेल्या बातमी ते फोटो वापरण्यात आले आहेत. तरुण भारतच्या बातमीनुसार, चिपळूण तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये भररस्त्यामध्ये डुकरासाठी लावलेल्या फासकीत अडकलेल्या बिबट्याने आठजणांवर हल्ला केला आणि तो जंगलात पसार झाला. पुढे दोन दिवसांनी त्याचा मृतदेह आढळला.

मूळ बातमी येथे वाचा – सकाळ । अर्काइव्ह
सकाळच्या बातमीत म्हटले की, गाणेखडपोली एमआयडीसी परिसरात लोकवस्तीच्या जवळच लावलेल्या फासकीमध्ये सकाळी 11 वाजता बिबट्या आढळून आला होता. रस्त्यापासून जवळच अडकलेल्या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. वाहनांचा आवाज, गर्दी पाहून बिबट्या घाबरला. फासकीतून स्वतःची सुटका करून घेतली आणि रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली.
काहीजण रस्त्यावर दुचाकी उभी करून बिबट्याला पाहण्यासाठी शेतात गेले होते. बिबट्या येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ते दुचाकी रस्त्यावर सोडून सैरावैरा पळाले. जखमी अवस्थेत बिबट्याने रस्त्यावर येऊन दुचाकी लावलेल्या ठिकाणी ठाण मांडले. बिबट्याचा हा थरार गाणेखडपोली येथे सुमारे तासभराहून अधिक काळ सुरू होता.
जय महाराष्ट्र वाहिनीनेसुद्धा या बिबट्याच्या या हल्ल्याच व्हिडियो दाखवला होता. तो तुम्ही खाली पाहू शकता.
मग विदर्भात वाघाने हल्ला केला होता का?
फॅक्ट क्रेसेंडोने यवतमाळमधील वन विभागाशी संपर्क केला असता कळाले की, गेल्या महिन्यात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र टाईम्सच्या बातमीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी परिसरातील बल्लारपूर (ढोकी) जवळ 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली होती. संभा लक्ष्मण कुडमेथे (58) असे मृत शेतकऱ्याचे नाव होते. ते बैलांना चारण्यासाठी घेऊन असता वाघाने बैलांवर झडप घालून त्यांना गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
गडचिरोली जिल्ह्यातही 27 जानेवारी रोजी देसाईगंज येथे गुरे चारण्यासाठी शेतात गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. सकाळच्या बातमीनुसार, पांडूरंग सयाम (वय 55) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. सयाम व कुसन कापगते हे दोघे गुरे चारण्यासाठी जंगलालगतच्या शेतात गेले होते. मात्र सयाम यांच्यावार वाघाने हल्ला करून फरफटत जंगलात नेले.
या दोन्ही घटनांमध्ये वाघाने मोटारसायकलवर हल्ला केला नव्हता.
निष्कर्ष
विदर्भात वाघाने मोटरसायकलवर हल्ला करून एकाला ठार केल्याचे म्हणून सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले फोटो जूने आणि चिपळूण व भोपाळमधील आहेत. यवतमाळ आणि गडचिरोलीमध्ये मोटरसायकरवर वाघाने हल्ला केल्याची घटना घडलेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका.

Title:चिपळूणमधील बिबट्याच्या हल्ल्याचे फोटो विदर्भात वाघाचा हल्ला म्हणून व्हायरल. वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
