
अरुणाचल प्रदेशमध्ये बोमडिलाजवळ 16 मार्च रोजी लष्करी हवाई दलाच्या चित्ता हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत लेफ्टनंट कर्नल व्हीव्हीबी रेड्डी आणि मेजर जयंत ए. या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला.
या पार्श्वभूमीवर अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करून दावा केला जात आहे की, ते अरुणाचल प्रदेशमधील चित्ता हेलिकॉप्टर दुर्घटनेचे आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून त्यांची सत्यता विचारली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटोंपैकी एक सहा महिन्यांपूर्वीचा आहे तर दुसरा उत्तर प्रदेशमध्ये 2017 साली झालेल्या अपघाताचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटो क्र. 1
व्हायरल फोटो सोबत युजर्स लिहितात की, “अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराच्या चित्ता हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला आहे.”

मुळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो अरुणाचल प्रदेशमधील चित्ता हेलिकॉप्टर दुर्घटनेचा नाही.
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार 15 मार्च 2017 रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहाबादजवळील बमरौली येथून प्रशिक्षणादरम्यान आपात्कालीन लॅडिंग करताना भारतीय हवाई दलाचे ‘चेतक हेलिकॉप्टर’ कोसळले होते. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे पायलटने लॅडिंग करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय हवाई दालाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले होते.
खालील व्हिडिओमध्ये व्हायरल फोटोमधील हेलिकॉप्टर पाहू शकतात.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्याला फरक लक्षात येईल.

व्हायरल फोटो क्र. 2
व्हायरल फोटोसोबत युजर्स लिहितात की, “अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्य दलाचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे.” इकोनॉमिक टाइम्स आणि झी बिझनेस यांनी देखील हा फोटो शेअर केला आहे.

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर काळले की, व्हायरल फोटो 6 महिन्यापूर्वीच्या दुर्घटनेचा आहे.
एएनआयच्या ट्विटनुसार 05ऑक्टोबर 2022 रोजी अरुणाचल प्रदेशमधील तवांग शहराता लष्करी हवाई दलाचे चित्ता हेलिकॉप्टर सकाळच्या सुमारास कोसळले होते.
या दुर्घटनेत एका पायलट मृत्यू झाला असून तर दुसरा गंभीर जखमी झाला होता.
निष्कर्ष
यावरुन स्पष्ट होते की, व्हायरल फोटो सध्याच्या अरुणाचल प्रदेशमधील हेलिकॉप्टर अपघाताशी संबंधित नाहीत. चुकीच्या दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:अरुणाचल प्रदेशमध्ये लष्करी हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर असंबंधित फोटो व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
