
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या अभूतपूर्व यशामुळे समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आहे. मोदींच्या विजयाचा आनंद केवळ भारतातच नाही तर, अमेरिकेतदेखील साजरा केला जात असल्याचे व्हिडियो सोशल मीडियावर पसरू लागले आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडियोमध्ये दावा केला जात आहे की, एका भारतीय कोट्यधीशाने अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात भर रस्त्यावर एक लाख डॉलर्स (सुमारे 69 लाख रुपये) रस्त्यावर उधळून भाजपचा विजयोत्सव साजरा केला. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.
काय आहे पोस्टमध्ये
एका मिनिटाच्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर पैशांच्या नोटा उधळताना दिसतो. नोटांचा वर्षाव होत असताना काही लोक रस्त्यावर पडलेल्या नोटा जमादेखील करीत आहेत. पोस्टमधील कॅप्शनमध्ये म्हटले की, न्यूयॉर्कच्या डायमंड मार्केट (47 स्ट्रीट) येथे आज एक विलक्षण दृश्य पाहायला मिळाले. एका भारतीय कोट्यधीशाने मोदींच्या भाजपचा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी एक लाख डॉलर्स वाटले.
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम या व्हिडियोचे इनव्हिड या टूलद्वारे विश्लेषण केले. व्हिडियोतील काही कीफ्रेम्स निवडून गुगल रिव्हर्स इमेज सर्च केले. त्यातून खाली दिलेला एक व्हिडियो समोर आला. हा व्हिडियोदेखील 1 मिनिटाचा आहे. सेव्हन50 नावाच्या चॅनेलवरील 15 मे रोजीच्या या व्हिडियोमध्ये म्हटले की, द गॉड जो कुश याने न्यूयॉर्कमधील डायमंड डिस्ट्रिक्ट येथे पैशाचा पाऊस पाडला. पाच डॉलरच्या नोटा त्याने रस्त्यावर फेकल्यामुळे पैसे गोळा करण्यासाठी लोकांची एक गर्दी उसळली.
हा धागा पकडून जो कुश याच्याबद्दल अधिक माहिती घेतली. त्याच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजनुसार, तो संगीतकार आहे. तो डेट्रॉईट शहरातील आहे. मनी शॉवर या व्हिडियो सीरिजअंतर्गत तो अमेरिकेतील विविध शहरांमध्ये अशा प्रकारे रस्त्यांवर पैसे उधळतो.
इन्स्टाग्रामवर न्यूयॉर्कमधील या प्रसंगाचे विविध व्हिडियो उपलब्ध आहेत.
पोलिसांनीदेखील पैशावर हात मारला.
टाईम्स स्क्वेयरमध्येदेखील त्याने पैशांचा असा पाऊस पाडला होता.
लास वेगास शहरातील हा व्हिडियो आहे.
जो कुशच्या यूट्यूब चॅनेलवरील हा हॉलिवूड वॉक ऑफ फेम येथे पैसे उधळतानाचा व्हिडियो
निष्कर्ष
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडियो हा भाजपच्या विजयानंतर अमेरिकत पैसे वाटतानाचा नाही. तो मूळात जो कुश नावाच्या एका म्युझिशियनचा आहे. त्याचा आणि भाजपच्या विजयाचा काहीच संबंध नाही. त्यामुळे हा दावा खोटा आहे.

Title:भाजपच्या विजयानंतर अमेरिकेत एका भारतीयाने 1 लाख डॉलर्स रस्त्यावर उधळून वाटले का?
Fact Check By: Mayur DeokarResult: False
