
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केरळमध्ये वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन केले. या पार्श्वभूमीवर रेल्वेत छत्री धरून बसलेल्या रेल्वेचालकाचा एक फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, पंतप्रधानांनी उद्धाटन केलेल्या वंदे भारत ट्रेनचे छत गळू लागले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, सात वर्षांपूर्वीचा झारखंडमधील जुना फोटो शेअर केला जात आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये एकीकडे नरेंद्र मोदी ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवी झेंडी दाखवत आहेत, तर दुसरीकडे चालक हातात छत्री धरून बसलेला आहे.
फोटो खालील ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “वंदे भारत ट्रेनच्या छतावरून पावसाचे पाणी थेट मोटरमॅनच्या केबिनमध्ये येत आहे. मोदींच्या वंदे भारत ट्रेनचा पोकळ वासा.”
हा फोटो शेअर करताना युजर्स लिहितात की, “मोदींच्या वंदे भारत ट्रेनचा पोकळ वासा.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो सात वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
पत्रकार सुचेता दलाल यांनी 9 ऑगस्ट 2017 रोजी रेल्वेत पाणी गळतीचा व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती सांगतो की, पावसाच्या पाण्याने रेल्वेच्या केबिनमध्ये गळती होत आहे. तसेच जागेची अडचण असल्याने त्यांनी आपले सामान समोरच्या खिडकीवर ठेवले आणि रेल्वे रुळावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना उभे राहावे लागत आहे.
सुचेता दलाल यांनी तत्कालिन रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंना टॅग करून या घटनेकडे लक्ष वेधले होते.
इंडिया टाईम्सच्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ झारखंडमधील धनबाद शहराजवळील होता.
तसेच व्हायरल पोस्टमध्ये याच सात वर्षांपूर्वीच्या व्हिडिओतील स्क्रीनशॉट वंदे भारत रेल्वेचा म्हणून वापरण्यात आला आहे.
वंदे भारत रेल्वेत गळती झाली का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 एप्रिल रोजी तिरुवनंतपुरमच्या रेल्वे स्टेशनवर वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन केले होते.
त्यानंतर वंदे भारत ट्रेनच्या पहिल्या प्रवासानंतर कासरगोड स्टेशनवर मोटरमॅनच्या केबिनमध्ये एसी वेंटमधून पाण्याची गळती होत असल्याची घटना समोर आली.
टाईम्स नाऊच्या बातमीनुसार, या गळतीची दुरुस्त करण्यात आली असून ही बाब फार गंभीर नव्हती.

ई–टीव्ही तेलंगना चॅनल या बातमी विषयी माहिती देत असताना व्हिडिओमध्ये 16 सेकंदावर आपल्याला मोटरमॅनचे केबिन दिसते. परंतु हे केबिन व्हायरल फोटो पेक्षा वेगळे आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो वंदे भारत ट्रेनचा नाही. हा फोटो 7 वर्षांपूर्वी झारखंडमधील एका रेल्वेचा आहे. चुकीच्या दाव्यासह जुना फोटो व्हायरल होत आहे.
Title:पाणी गळतीमुळे छत्री धरलेल्या रेल्वेचालकचा व्हायरल फोटो वंदे भारत ट्रेनचा नाही; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Partly False


