
हाथरस येथील पीडितेचा म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही जण टाळ्या वाजवत एका मुलीचे स्वागत करताना, पाया पडताना दिसत आहेत. त्या मुलीला अनेक जण फुल देत आहेत. तिच्यावर फुलांची उधळण देखील करत आहेत.
काय आहे दावा?
या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मनिषा वाल्मिकी, हाथरस युपी परिक्षेत पहिली आली होती. बघा तिचा आत्मउत्साह आणि स्वागत सोहळा.
तथ्य पडताळणी
हाथरसमधील पीडित युवतीचा हा व्हिडिओ आहे की अन्य कुणाचा, याची माहिती घेण्यासाठी या व्हिडिओतील एक द्दश्य घेत ते रिव्हर्स इमेज केले. त्यावेळी एम. डी. आदिल फयाज नावाच्या युटुयूब चॅनलवर हा व्हिडिओ आम्हाला दिसून आला.
त्यानंतर याच नावाचे फेसबुक खातेही दिसून आले. या खात्यावर असलेले छायाचित्र आणि युटूयूबवर असलेले प्रोफाईलचे छायाचित्र एकच असल्याचे दिसून आले. हे छायाचित्र नीट पाहिल्यावर त्यावर सेफ शॉप लिहिले असल्याचे दिसून आले.
त्यानंतर शोध घेतल्यावर सेफ शॉप या ई-कॉमर्स कंपनीचे संकेतस्थळ दिसून आले.
या कंपनीच्या एका माजी अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्यांनी या मुलीची ओळख सांगत तिच्या इन्स्टाग्राम खात्याची लिंक पाठवली. या मुलीचे नाव नाझिया खान असल्याचे यातून स्पष्ट झाले. या मुलीचे युटूयूबवरही अनेक व्हिडिओ उपलब्ध असल्याचे दिसून आले. यातील एका व्हिडिओत तिने तिच्याविषयीची माहितीही दिली आहे. यातील तिच्या लहानपणीच्या छायाचित्राखाली तिचे नाव नाझिया असे लिहिल्याचे आपण स्पष्टपणे पाहू शकता.
नाझियाच्या या व्हिडिओत ती व्हायरल होत असलेल्या व्हिडिओविषयी देखील माहिती देत असल्याचे दिसून येते. लीडरस् टीमच्या कोअर ट्रेनिंगसाठी ती गेली होती. त्याठिकाणी टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत करण्यात आले. हे ट्रेनिंग तिने नोव्हेंबर 2017 मध्ये घेतले होते. याविषयी तुम्ही 8.15 ते 10.30 या कालावधीत खालील व्हिडिओ ऐकू शकता.
या माहितीतून हे स्पष्ट झाले की, नाझिया खान या एक प्रेरक वक्ता आहेत. सेफ शॉपच्या पर्ल पदवी असलेल्या साईप्रसाद या कर्मचाऱ्याशी संपर्क केल्यावर त्याने स्पष्ट केले की, व्हिडिओत दिसणारी युवती ही हाथरसमधील पीडिता नाही. या नाझिया खान आहेत. त्या सेफ शॉप कंपनीत कार्यरत आहेत. त्या हैदराबादमध्ये राहतात. हाथरसमधील घटनेशी त्यांचा काहीही संबंध नाही. कंपनीत त्या डायमंड पदावर आहेत. दोन दिवसांपुर्वी कंपनीची बैठक झाली. या बैठकीतही त्या उपस्थित होत्या. बैठकीत त्यांच्यासोबत चर्चा देखील झाली. व्हायरल व्हिडिओतील द्दश्ये ही एक प्रशिक्षण कार्यक्रमातील आहेत. मी देखील अशा कार्यक्रमांना उपस्थित राहिलेलो आहे.
निष्कर्ष
हाथरस येथील पीडितेचा हा व्हिडिओ असल्याचा दावा असत्य आहे. नाझिया खान नावाच्या युवतीचा हा व्हिडिओ आहे.

Title:हाथरसमधील पीडितेचा म्हणून हैदराबादमधील युवतीचा व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
