
भाजीपाला विक्री करणे तरुण तरुणींना कमीपणाचे वाटते. इन्फोसिसच्या सह-संस्थापिका आणि नावाजलेल्या लेखिका सुधा मूर्ती दरवर्षी एक दिवस भाजी विकायला बसतात केवळ अहंकार दूर ठेवण्यासाठी, अशा माहितीसह समाजमाध्यमात सुधा मुर्ती यांचे एक छायाचित्र व्हायरल होत आहे. सुधा मुर्ती या छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.
तथ्य पडताळणी
सुधा मुर्ती वर्षातून एकदा भाजी विकत असल्याचे हे छायाचित्र आहे का, याचा शोध घेतला. त्यावेळी Bangalore Mirror (संग्रहित) या संकेतस्थळावर 27 ऑक्टोबर 2013 रोजी प्रसिध्द झालेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार बंगळुरू शहरातील जया नगर या भागातील राघवेंद्र स्वामी मंदिरात सुधा मुर्ती या वर्षातून तीन वेळा सेवा करतात. या वृत्तात सुधा मुर्ती यांचे हे छायाचित्र मात्र नव्हते.
त्यानंतर इकोनॉमिक्स टाईम्सच्या वरिष्ठ संपादिका चंद्रा श्रीनाथ यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून 13 सप्टेंबर 2020 रोजी त्यांनी केलेले एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये त्यांनी या छायाचित्राबाबत इन्फोसिस फाऊंडेशनला विचारले त्यावेळी फाऊंडेशनने त्या सुधा मुर्ती असल्याचे सांगितले. त्या भाजी विकत नसून राघवेंद्र स्वामी मंदिरात सेवाकार्य करत असतानाचे सांगितले.
निष्कर्ष
सुधा मुर्ती यांचे राघवेंद्र स्वामी मंदिरात सेवाकार्य करत असतानाचे छायाचित्र त्या भाजी विकत असल्याचे म्हणून व्हायरल होत आहे. त्या भाजी विकत असल्याचे असत्य आहे.

Title:सुधा मुर्ती वर्षातून एकदा भाजी विकतात का? वाचा सत्य
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
