
तिरुपती बालाजी देवस्थानाच्या एका विश्वस्ताच्या घरातून 128 किलो सोनं आणि 150 कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली, अशा दाव्यासह टेबलवर ठेवलेल्या दागिन्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदरील विश्वस्ताच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली असता एवढी मोठी अवैध संपत्ती सापडली, असे व्हायरल मेसेज म्हटले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ तमिळनाडूमधील वेल्लोर शहरात एका चोरट्याच्या घरातून जप्त करण्यात आलेल्या सोन्याचा आहे.
काय आहे दावा?
व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आयकर विभागाच्या छापां मध्ये हा तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थान मध्ये जी 16 विश्वस्त आहेत त्यापैकी हा एक विश्वस्त आहे त्याच्या घरी आय कर विभाग ने छापे मारले 128 किलो सोनी 150करोड कॅश आणि70 करोड चे हिरे सापडले आहेत भक्तांना विचार करा आपला पैसा कुठे जात आहे सोळा विश्वस्तांनपैकी पैकी एकाकडे एवढा पैसा तर बाकी च्या कडे किती? दान करायचे असेल तर गोर- गरिबांना करा.”

मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह । फेसुबक
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम या व्हिडिओतील की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले असता तमिळ गलाटा नामक एका युट्यूब चॅनेलवर 21 डिसेंबर रोजी अपलोड झालेल्या पोलिसांच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ आढळला.
आमच्या तमिळ भाषिक टीमच्या मदतीने आम्हाला कळाले की, या व्हिडिओमध्ये पोलिस तमिळनाडूमधील वेल्लोर शहरातील एका चोराच्या घरातून जप्त केलेल्या 16 किलो सोन्याबद्दल माहिती देत आहेत.
हा धागा पकडून शोध घेतल्यावर वेल्लोर शहाराचे पोलिस उपअधीक्षकांचे ट्विट आढळले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, Jos Alukkas नामक ज्वेलरी शोरूममधून चोरी झालेले 8.5 कोटी रुपये किंमतीचे 16 किलो सोने आरोपीकडून वसूल करण्यात वेल्लोर पोलिसांना यश आले.
फॅक्ट क्रेसेंडोने वेल्लोरचे पोलिस उपमहानिरीक्षक ए. जी. बाबू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, “व्हायरल होत असलेला व्हिडिओ वेल्लोर येथील ज्वेलरी शोरूममधून चोरी गेलेल्या सोन्याचा आहे. त्याचा तिरुपती बालाजी मंदिराच्या विश्वस्ताचा काही संबंध नाही.”
इंडिया टुडेच्या बातमीनुसार, पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव थिकरम असे आहे. त्याने 15 डिसेंबर रोजी वेल्लोरस्थित शोरूमची 10 दिवस प्रयत्न करून भिंत फोडून आणि सुमारे 16 किलो सोने पसार केले. ही सर्व प्लॅनिंग त्याने यूट्यूब व्हिडिओ पाहून केल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले होते.
‘द हिंदू’च्या बातमीनुसार, 23 वर्षीय आरोपीने चोरी केलेले दागिने त्याच्या घरात पुरून ठेवले होते.

बालाजी देवस्थानाच्या ट्रस्टीवर कधी धाड पडली होती?
बालाजी देवस्थानाचे तमिळनाडूस्थित विश्वस्त – जे शेखर रेड्डी – यांच्या प्रॉप्रटीवर डिसेंबर 2016 मध्ये आयकर विभागाने छापेमारी केली होती. चलनबंदी नंतर टाकण्यात आलेल्या या धाडीमध्ये 100 कोटी रुपये रोकड सापडली होती. यामध्ये 10 कोटी रुपयांच्या त्याकाळातील नव्या दोन हजारांच्या नोटासुद्धा होत्या. तसेच, 120 किलो सोनंसुद्धा जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणी सीबीआयने रेड्डी यांना 2018 मध्ये अटक केली होती. परंतु, 2019 मध्ये आयकर विभागाने तपासाअंती सांगितले की, हा सर्व पैसा वाळू विकून मिळवलेला होता. 2020 मध्ये सीबीआयने सांगितले होते की, रेड्डी विरोधात त्यांच्याकडे कोणताही सबळ पुरावा नाही.
तत्पूर्वी, आयकर विभागाच्या कारवाईनंतर आंध्र प्रदेश सरकारने रेड्डी यांना बालाजी देवस्थानाच्या विश्वस्त मंडळातून कमी होते. परंतु, 2019 मध्ये त्यांना विश्वस्त म्हणून परत घेण्यात आले.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा बालाजी देवस्थानाच्या ट्रस्टीच्या घरातून जप्त झालेल्या सोन्याचा नाही. तो व्हिडिओ तमिळनाडूनतील वेल्लोर येथील ज्वेलरी शोरूममधील चोरी गेलेल्या दागिन्यांचा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:तिरुपती बालाजी मंदिराच्या ट्रस्टीच्या घरातून मिळालेल्या सोन्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: Partly False
