शाहनवाझ हुसैन खरंच मुरली मनोहर जोशी यांचे जावई आहेत का? वाचा काय आहे सत्य

False राजकीय | Political

सोशल मीडियावर सध्या दावा केला जात आहे की, भाजपा नेते शाहनवाझ हुसैन हे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचे जावई आहेत. शाहनवाझ यांनी जोशी यांच्या मुलीशी विवाह केला, अशा आशयाच्या पोस्ट सध्या फिरत आहेत. पुरावा म्हणून या तिघांचा एकत्र फोटोदेखील शेयर केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या दाव्याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्हफेसबुक

काय आहे पोस्टमध्ये?

पोस्टमध्ये शाहनवाझ आणि त्यांच्या पत्नीचा फोटो शेयर करून कॅप्शन दिले की, बीजेपी हृदयसम्राट “आदरणीय मुरली मनोहर जोशी” के पुज्य दामाद “सैयद शहनवाज हुसैन” के जन्मदिवस पर मंगल कामनाएँ (भाजपचे हृदयसम्राट आदरणीय मुरली मनोहर जोशी यांचे पूज्य जावई सैयद शाहनवाझ हुसैन यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा). काही पोस्टमध्ये शाहनवाझ, त्यांची पत्नी व मुरली मनोहर जोशी यांचा फोटो शेयर करून लिहिले की, हिन्दू ह्रदय सम्राट श्री मुरली मनोहर जोशी जी अपनी बेटी और दामाद शहनवाज हुसैन के साथ ईद मनाते हुए (मुरली मनोहर जोशी कन्या आणि जावई शाहनवाझ हुसैस यांच्यासोबत ईद साजरी करताना)

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आम्ही शाहनवाझ हुसैन यांची पत्नी कोण याचा शोध घेतला. द वीक मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहनवाझ आणि त्यांची पत्नी यांची प्रेमकहाणी कशी घडली हे सांगितले आहे. मुलाखतीमध्ये स्पष्ट लिहिले आहे की, लग्नाआधी शाहनवाझ यांच्या पत्नीचे नाव रेणू शर्मा होते. भारतीय सरकारच्या वेबसाईटवरदेखील हीच माहिती उपलब्ध आहे.

मूळ मुलाखत येथे वाचा – द वीकअर्काइव्ह

दैनिक भास्करमधील लेखानुसार, शाहनवाझ आणि रेणू यांची 1986 साली प्रथम भेट झाली होती. त्यावेळी शाहनवाझ दिल्लीत पदवीचे शिक्षण घेत होते. बसमधून सुरू झालेल्या या प्रेम कहाणीला पूर्ण होण्यासाठी नऊ वर्षे लागले. वेगवेगळ्या धर्माचे असल्याने सुरुवातीला कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. परंतु, उमा भारतीच्या पुढाकाराने 1994 साली त्यांनी लग्न केले. त्यांना अरबाझ आणि अदिब अशी दोन मुले आहेत. अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रीमंडळातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री होण्याचा मान शाहनवाझ यांना मिळाला होता.

सविस्तर येथे वाचा – दैनिक भास्करअर्काइव्ह

यावरून हे तर स्पष्ट होते की, शाहनवाझ हुसैन यांच्या पत्नीचे नाव रेणू शर्मा आहे. मग मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत त्यांचे नाते काय? याचा आम्ही शोध घेतला. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर पक्षाच्या विविध अध्यक्षांची सविस्तर माहिती दिलेली आहे. मुरली मनोहर जोशी यांच्याबद्दल असलेल्या लेखातील माहितीनुसार, त्यांच्या पत्नीचे नाव तरला असून त्यांना दोन मुली आहेत. निवेदिता आणि प्रियम्वदा अशी त्यांची नावे आहेत. भारतीय सरकारच्या वेबसाईटवरदेखील हीच माहिती उपलब्ध आहे.

मूळ लेख येथे वाचा – भाजप वेबसाईटअर्काइव्ह

योग गुरू बी. के. एस. अय्यंगार यांच्या निधनानंतर मुरली मनोहर जोशी यांची कन्या निवेदिता जोशी यांनी रेडिफ वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये अय्यंगार यांच्या आठवणींना उजाळा दिला होता. वयाच्या 15 व्या वर्षापासून निवेदिता यांना स्लीप डिस्क स्पॉन्डिलिसिसमुळे पलंगाला खिळून राहावे लागले होते. अय्यंगार यांच्या योग उपचारांतून त्या पूर्णपणे बऱ्या झाल्याचे निवेदिता सांगतात. सध्या त्या दिल्लीमध्ये अय्यंगार योग केंद्र योगक्षेम हे योग प्रशिक्षण केंद्र चालवितात. मुलाखतीमध्ये त्यांचे विविध फोटोदेखील देण्यात आले आहेत.

मूळ मुलाखत येथे पाहा – रेडिफअर्काइव्ह

निष्कर्ष

शाहनवाझ हुसैन यांच्या पत्नीचे नाव रेणू शर्मा आहे. मुरली मनोहर जोशी यांच्या मुलींची नावे निवेदिता आणि प्रियम्वदा जोशी अशी आहेत. त्यामुळे शाहनवाझ त्यांचे जावई होण्याचा प्रश्नच नाही. शाहनवाझ आणि जोशी यांचा दुरान्वयेदेखील नातेसंबंध नाही. ते एकाच पक्षाचे सदस्य आहेत. त्यामुळे ही पोस्ट असत्य ठरते.

Avatar

Title:शाहनवाझ हुसैन खरंच मुरली मनोहर जोशी यांचे जावई आहेत का? वाचा काय आहे सत्य

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False