पोप फ्रान्सिस यांच्यासाठी जमलेल्या गर्दीचा व्हिडिओ इम्तियाज जलील यांच्या रॅलीचा म्हणून व्हायरल
काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई ‘तिरंगा संविधान रॅली’ काढली होती. या रॅलीला पोलिसांनी मुलुंड टोलनाक्यावर अडविले आणि यामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.
याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये रात्रीच्या वेळी रसत्यावरील लोकांच्या गर्दीतून चारचाकी वाहने जाताना दिसतात.
दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ इम्तियाज जलील यांच्या छत्रपती संभाजीनगर ते मुंबई ‘तिरंगा संविधान रॅली’चा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ इम्तियाज जलील यांच्या रॅलीचा नाही. ही गर्दी पोप फ्रान्सिस यांनी पूर्व तिमोर नामक देशाला दिलेल्या भेटीदरम्यानची आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी रसत्यावरील लोकांच्या गर्दीतून चारचाकी वाहने जाताना दिसतात.
हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “कालची रॅली बघा मुंबई-भिवंडी मध्ये, संभाजी नगर चे इम्तियाझ जलील यांनी काढली होती.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्र किंवा भारतातील नाही.
नायजेरियन कॅथलिक नामक फेसबुक पेजने हाच व्हिडिओ 12 सप्टेंबर रोजी शेअर केला होता.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पोप फ्रान्सिस यांनी शंभर टक्के कॅथोलिक असलेल्या तिमोर-लेस्टे देशाला भेट दिल्यावर त्यांचे स्वागत करण्यात आले.”
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, पोप फ्रान्सिस यांनी 10 सप्टेंबर रोजी पूर्व तिमोरमधील तासिटोलु या ठिकाणी भेट दिली होते. या वेळी पोप फ्रान्सिसचे स्वागत करण्यासाठी अंदाजे 6 लाख लोक जमले होते.
अधिक माहिती येथे व येथे वाचू शकता.
टीव्हीईटी एंटरटेनमेंट न्यूज चॅनलने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर पोपच्या समारंभाचे थेट प्रक्षेपण केले होते. यामध्ये आपण रस्त्यावरील लोकांच्या गर्दीतून वाहनांचा ताफा जाताना पाहू शकतो.
इम्तियाझ जलील रॅली
लोकसत्ताच्या बातमीनुसार रामगिरी महाराज आणि भाजपचे नेते नितेश राणे यांच्या प्रक्षोभक विधानांचा निषेध करत 24 सप्टेंबर रोजी इम्तियाझ जलील यांनी ‘तिरंगा संविधान रॅली’ या मोर्चाची हाक दिली होती.
राज्याच्या विविध भागांतून बस, मोटारी आणि दुचाकींवरून पक्षाचे हजारो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
छत्रपती संभाजीनगरमधून निधालेल्या या ताफ्याला पोलिसांनी मुंबईच्या वेशीवरील मुलुंड टोलनाका येथे अडविले. यादरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
खालील व्हिडिओमध्ये आपण तिरंगा संविधान रॅलीच्या ताफ्याचे काही दृश्य पाहू शकतो.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील गर्दी इम्तियाज जलील यांच्या रॅलीची नाही. पूर्व तिमोरमध्ये पोप फ्रान्सिस यांच्या स्वागतासाठी ही गर्दी जमली होती. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)