
आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. एकमेकांवर टीका आणि आश्वासनांचा वर्षाव सुरू आहे. मतदारांना आकर्षित करून विरोधकांवर कुरघोडी करण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे अनेक दावे केले जात आहेत.
असाच एक दावा झी 24 तास या वृत्तस्थळाने काँग्रेस पक्षाच्या सदस्यसंख्येविषयी केला आहे. झी 24 तासने दिलेल्या बातमीनुसार, गेल्या एका महिन्यात काँग्रेस पक्षासोबत दहा लाख नवे कार्यकर्ते जोडले गेले आहेत.

झी 24 तासच्या फेसबुक पेजवरून ही बातमी 9 मार्च 2019 रोजी पोस्ट करण्यात आली होती. पडताळणी करेपर्यंत या पोस्टला सुमारे 4800 लाईक्स आणि 193 वेळा शेयर मिळाल्या आहेत.
पोस्टवर 462 कमेंट्सदेखील आहेत. कमेंटमध्ये अनेकांनी या बातमीवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे. तसेच काँग्रेस पक्षाची खिल्लीदेखील उडविली आहे. एकाने लिहिले की, काँग्रेसने जसे बालाकोट हवाई हल्ल्याचे पुरावे मागितले तसे 10 लाख कार्यकर्ते खरोखरंच वाढल्याचाही पुरावा द्यावा. दुसऱ्याने उपहासाने म्हटले की, हा आकडा सोडून गेलेल्यांचा असेल. एकाच्या मते दहा लाख नाही तर केवळ 10 वाढले असतील. फॅक्ट क्रेसेंडोने या बातमीची पडताळणी केली.

तथ्य पडताळणी
झी 24 तासच्या बातमीनुसार, प्रियांका गांधी यांनी सक्रीय राजकारणात पदार्पण केल्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा लाभ होत आहे. त्यांनी उत्तर प्रदेशची धुरा हाती घेताच काँग्रेससोबत बुथ स्तरावर गेल्या महिनाभरात 10 लाख नवीन कार्यकर्ते जोडले गेले. एकट्या उत्तर प्रदेशमध्ये कार्यकर्त्यांच्या संख्येत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाल्याचेही बातमीत म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – झी 24 तास । अर्काइव्ह
बातमीतील ठळक मुद्देः
1. गेल्या चार आठवड्यांमध्ये काँग्रेस पक्षाशी 10 लाख नवे कार्यकर्ते जोडले गेले.
2. तामिळनाडूमध्ये अडीच लाख नवीन बूथ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
3. देशभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची संख्या ५.४ कोटीवरून ६.४ कोटींपर्यंत पोहोचली
फॅक्ट क्रेसेंडोने सर्वप्रथम गुगलवर यासंदर्भात शोध घेतला. तेव्हा जनसत्ता या हिंदी भाषिक वृत्तस्थळावरील बातमी आढळली. या बातमीमध्ये देखील झी 24 तासप्रमाणेच दावे करण्यात आले आहेत. परंतु, येथे इकोनॉमिक टाईम्सचा दाखला देत म्हटले की, प्रियांका गांधी यांच्या आगमनामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह आला आहे. उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्येदेखील बुथस्तरावर नागरिक जोडले जात आहेत.

मूळ बातमी येथे वाचा – जनसत्ता । अर्काइव्ह
फॅक्ट क्रेसेंडोने मग इकोनॉमिक टाईम्सवरील संबंधित बातमीचा शोध घेतला. अनुभुती विश्नोई या पत्रकाराने 9 मार्च 2019 रोजी ही बातमी सर्वप्रथम दिली होती. इंग्रजीतील या वृत्तामध्ये, काँग्रेस पक्षाच्या डेटा अॅनालिटिक्स विभागाचे चेयरमन प्रवीण चक्रवर्ती यांच्या माध्यमातून ही माहिती मिळाल्याचे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी 23 जानेवारी रोजी प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेश (पूर्व) महासचिव म्हणून नियुक्ती केली. त्यांनी 6 फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला. तेव्हापासून देशभरात काँग्रेसच्या बुथ कार्यकर्त्यांमध्य दहा लाखाने (एक मिलियन) वाढ झाली आहे. त्यामुळे देशभरात काँग्रेसची बुथस्तरीय कार्यकर्त्यांची संख्या 54 लाखांवरून आता सुमारे 64 लाख झाली आहे. यासाठी डेटा अॅनालिटिक्स टीमने तयार केलेल्या शक्ती अॅपची मोठी मदत झाल्याचे बातमीत म्हटले आहे.

मूळ बातमी येथे वाचा – द इकोनॉमिक टाईम्स
यानंतर आम्ही काँग्रेसच्या डेटा अॅनालिटिक्स विभागाशी उपरोक्त माहितीच्या सत्यतेबाबत विचारणा केली. या विभागाकडून फॅक्ट क्रेसेंडोला प्राप्त झालेल्या ई-मेलमध्ये वरील माहिती आणि बातमी खरी असल्याचे म्हटले आहे.
ई-मेलनुसार, “शक्ती प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेल्या पाच आठवड्यांमध्ये 10 लाख 3 हाजर 406 कार्यकर्ते काँग्रेसशी जोडले गेले आहेत. यापैकी 35 टक्के कार्यकर्ते तर एकट्या एकट्या तमिळनाडूनमधील आहेत. याव्यतिरिक्त कर्नाटक, आसाम, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या स्थितीला आमची एकुण संख्या 65 लाख 10 हजार 327 एवढी आहे.”

यावरून हे स्पष्ट होते की, इकोनॉमिक टाईम्सने दिलेली एक्सक्लुसिव्ह बातमी खरी आहे. त्यामुळे या बातमीवरून इतरांनी केलेल्या बातम्यादेखील सत्य आहेत. फरक एवढाच की, झी 24 तासने 6.4 मिलियनला 6.4 कोटी असे रुपांतर केले, जे की 64 लाख हवे होते.
निष्कर्ष
काँग्रेसच्या डेटा अॅनालिटिक्स विभागाच्या अधिकृत आकडेवारीवरून झी 24 तासची बातमी सत्य सिद्ध होते. गेल्या एका महिन्यात शक्ती अॅपच्या माध्यमातून दहा लाख नवे कार्यकर्ते जोडले गेले.

Title:तथ्य पडताळणीः एका महिन्यात काँग्रेसमध्ये 10 लाख नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश?
Fact Check By: Mayur DeokarResult: True
