
भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांचे या महिन्याच्या सुरूवातील हेलिकॉप्टर कोसळून निधन झाले. त्यांच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताचे व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स व्हायरल झाल्या. अशाच एका क्लिपमध्ये हवेत गटंगळ्या खाणाऱ्या पेटलेल्या हेलिकॉप्टरचा व्हिडिओ शेअर करून दावा केला जात आहे की, तो बिपिन रावत यांच्या अपघाताचा आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ जुना असून, तो भारतातील नाही.
काय आहे दावा?
सदरील व्हिडिओसोबत कॅप्शन दिले आहे की, “हेलिकॉप्टर क्रश कसं झालं तर हा व्हिडीओ बगा कोणी तरी हा व्हिडिओ शूट केला होता.”
मूळ पोस्ट – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेतला. त्याकरिता व्हिडिओतील की-फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. आलेल्या परिणामांमधून कळाले की हा व्हिडिओ सीरियातील आहे.
‘द टेलिग्राफ’ वृत्तपत्राने 11 फेब्रुवारी 2020 रोजी त्यांच्या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ अपलोड केला होता. सोबतच्या माहितीनुसार, सीरियातील नैराबी भागात सीरियन हवाई दलाच्या हेलिकॉप्टरवर हल्ला करण्यात आला होता.
असोसिएटेड प्रेसच्या बातमीनुसार, बंडखोर गटाने उत्तर सीरिया भागात सरकारी लष्कराचे हेलिकॉप्टर हाणून पाडले होते. यामध्ये पायलट व इतर क्रू सदस्य मारले गेले होते.
तुर्कस्थानच्या अनाडोलू वृत्तसंस्थेनुसार, जमिनीवरून या हेलिकॉप्टरवर हल्ला करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये पायलट व इतर एक जण खाली पडताना दिसते.
असोसिएटेड प्रेसने या घटनेचा अधिक लांबीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, हा व्हिडिओ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचा नाही. तो सीरियातील लष्करी हेलिकॉप्टरवर 2020 झालेल्या हल्ल्याचा आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:सीरियातील हेलिकॉप्टर स्फोटाचा व्हिडिओ बिपिन रावत यांच्या निधनाचा सांगत व्हायरल
Fact Check By: Agastya DeokarResult: False
