महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः कोकणामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे पूरग्रस्तांना समाजाच्या सर्वस्तरातून मदतीचे हात समोर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते मदत करतानाचा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की, महाड रेल्वेस्थानकवर पूरग्रस्तांसाठी जेवण तयार करत आहेत.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा फोटो गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमधील मोरोदाबा स्थानकावरील आहे.

काय आहे दावा?

रेल्वे प्लॅटफॉर्मवर स्वयंपाक करणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांचा फोटो शेअर करून म्हटले की, “महाड रेल्वे स्टेशनवर पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी स्वयंपाक बनवताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक.”

मूळ पोस्ट – फेसबुक

हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला आहे.

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, हा फोटो महाड रेल्वे स्थानकावरील नाही, तसेच हा फोटो या वर्षीचादेखील नाही.

ANI वृत्तसंस्थेच्या 26 मे 2020 रोजच्या बातमीनुसार, हा फोटो उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद रेल्वे स्थानकावरील आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या आगमनानंतर संपूर्ण देशात टाळेबंदी लावण्यात आली होती. त्यामुळे लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना जेव्हा घरी जाण्याची परवानगी देण्यात आली तेव्हा लाखो मजूर आपापल्या राज्यांमध्ये परतले.

मोरादाबाद रेल्वेस्थानकांवर या मजुरांना अन्नाची पाकीटे आणि पाणी वाटप करण्याचे काम संघाच्या स्वयंसेवकांनी केले होते. प्लॅटफॉर्मवर जेवण तयार करताना हा फोटो त्यावेळीचा आहे.

Screenshot from ANI

संघाचे जनसंपर्क प्रमुख पवन जैन यांनी माहिती दिली होती की, सुमारे 400 स्वयंसेवकांनी मोरादाबाद स्थनाकावरील मदतकार्यात सहभाग घेतला होता.

या मदतीचा व्हिडिओदेखील ANI ने शेअर केलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=HTSh6ZfxT7A

दरम्यान, संघातर्फे मुंबई आणि कोकणातील पूरग्रस्त भागांमध्ये मदतीचे कार्यदेखील करण्यात आलेले आहे. जनकल्याण समितीच्या वतीने कल्याण-डोंबिवली, रायगड-रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त नागरिकांना जेवणाची व्यवस्था, पिण्याचे पाण्याची व्यवस्था आणि सुरक्षित स्थळे हलविणे आदी मदत करण्यात येत आहे.

समितीद्वारे ट्रकने 26 जुलै रोजी तांदुळ, डाळी, पाणी, पीठ व इतर अत्यावश्यक सामान पूरग्रस्त कोकण भागात पाठविण्यात आले.

https://twitter.com/friendsofrss/status/1419691309099405312

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, महाड रेल्वे स्थानकावर पूरग्रस्तांसाठी स्वयंपाक करणाऱ्या स्वयंसेवकांचा म्हणून शेअर करण्यात येत असलेला हा फोटो मूळात गेल्या वर्षी संघातर्फे यूपीतील मोरादाबाद स्थानकावर करण्यात आलेल्या मदतीचा आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:संघाच्या स्वयंसेवकांचा हा फोटो महाड रेल्वेस्थानकावरील नाही; तो यूपीमधील आहे

Fact Check By: Agastya Deokar

Result: False