
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये समुद्रात एका जहाजावर मोठा स्फोट होताना दिसतो.
दावा केला जात आहे की, इराणने क्षेपणास्त्र हल्ला करत अमेरिकन जहाजाला तेलाचा पुरवठा करणाऱ्या पाकिस्तानी तेलवाहू जहाजाचा स्फोट घडवून आणला.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2022 मधील समुद्री सैन्य सरावाचा आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये समुद्रात एका जहाजावर मिसाईल हल्ला झालेला दिसतो.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पाकिस्तान अमेरिकन जहाजाला तेलाचा पुरवठा करत होता. हे लक्षात आल्यावर इराणने क्षेपणास्त्राने तो टँकर उडवून दिला.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2022 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
हारियन मेट्रो नामक न्यूज संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवर हाच व्हिडिओ 16 जुलै 2022 रोजी अपलोड केलेला आढळला. यावरून स्पष्ट होते की हा व्हिडिओ सध्याचा नाही.
व्हिडिओसोबत दिलेल्या माहितीनुसार, हा ‘रिमपॅक 2022’ (RIMPAC 2022) या आंतरराष्ट्रीय समुद्री सैन्य सरावाचा भाग आहे. या सरावात अनेक देशांच्या नौदलांचा सहभाग असतो.
पुढील तपासात मिळालेल्या रिपोर्टनुसार, रॉयल मलेशियन नेव्हीच्या ‘लेकिर’ (Lekir) या जहाजाने 12 जुलै 2022 रोजी अमेरिकेच्या हवाईजवळील समुद्रात एक्सोसेट एमएम40 (Exocet MM40) मिसाईल यशस्वीपणे प्रक्षेपित केली होते.
हा प्रक्षेपण ‘सिंकिंग एक्सरसाइज’ (SINKEX) या सरावाचा भाग होता, ज्यामध्ये जुने जहाज लक्ष्य म्हणून वापरले जाते.
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ 2022 मधील समुद्री सैन्य सरावाचा आहे. याचा इराणने पाकिस्तानी जहाजावर हल्ला केल्याच्या दाव्याशी कोणताही संबंध नाही. दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामवट्विटरयेथे फॉलो करा.)


